मुंबई/दुबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत (T-20 World Cup) रविवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी (India vs New Zealand) होत आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांना विजय गरजेचा आहे.
टी-२० विश्वचषकात भारताची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यातच हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फिटनेस भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. पाठीला झालेल्या दुखापतीनंतर पांड्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली. मात्र तो पूर्णपणे फिट नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिकनं गोलंदाजी केलेली नाही. गेल्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिकला यंदा मात्र छाप पाडता आली नाही.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या अपयशी ठरला. त्यानंतर निवड समिती त्याला भारतात पाठवणार होती. मात्र महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) (टीम इंडियाचा मेंटॉर) पांड्यावर विश्वास दाखवला. डाव संपवण्याचं कौशल्य पांड्याकडे आहे. त्याचा उपयोग संघाला होऊ शकतो, अशी भूमिका धोनीनं मांडली. त्यामुळे हार्दिकला दुबईहून मायदेशी पाठवण्यात आलं नाही.
संघात पांड्याची नेमकी भूमिका काय?टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पांड्या ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात पांड्याला ८ चेंडूंत ११ धावा करता आल्या. त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यानं गोलंदाजी केली नाही. सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याची तयारी करत आहे. पांड्या नेट्समध्ये फलंदाजीसोबतच गोलंदाजीचाही सराव करताना दिसत आहे. त्यामुळे पुढील सामन्यात तो गोलंदाजी करताना दिसू शकतो.
...तर भारतासमोर तीन पर्यायहार्दिक पांड्याची निवड अष्टपैलू म्हणून करण्यात आली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याला गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा संघाला एक गोलंदाज कमी पडेल आणि समतोल बिघडेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करून पांड्याला धोनीचा विश्वास सार्थ ठरवावा लागेल. अन्यथा भारतीय संघासमोर तीन पर्याय आहेत. शार्दुल ठाकूर, दीपक चहार आणि व्यंकटेश अय्यर यांना पांड्याच्या जागी संधी मिळू शकते.