Join us  

T20 World Cup, Namibia  advance into the Super 12 : शारजात इतिहास घडला, नामिबियानं तगड्या आयर्लंडला धक्का देत प्रथमच Super 12मध्ये प्रवेश केला

T20 World Cup, Namibia advance into the Super 12 - ० बाद ६२ वरून आयर्लंडचा डाव जो गडगडला तो कुणाला सावरताच आला नाही. आयर्लंडला २० षटकांत ८ बाद १२५ धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 7:02 PM

Open in App

T20 World Cup, Namibia  advance into the Super 12 :  नेदरलँड्सला पराभूत करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील पहिल्या विजयाची नोंद करणाऱ्या नामिबायनं संघानं Round 1 मधील ग्रुप अ च्या अखेरच्या साखळी सामन्यात आयर्लंडलाही पराभवाची चव चाखवली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर नामिबियाच्या फलंदाजांनीही त्यांची भूमिका चोख बजावली आणि ८ विकेट्स राखून विजय मिळवला. नामिबियानं या विजयासह इतिहास घडवताना प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 मध्ये प्रवेश केला.  

आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शाहजा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत आयर्लंडच्या पॉल स्टिर्लिंग आणि केव्हीन ओ'ब्रायन या अनुभवी जोडीनं सुरेख सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा उचलताना ५५ धावा चोपल्या. पण, ८व्या षटकापासून आयर्लंडचा डाव गडगडला. धावफलकावर ६२ धावा असताना स्टिर्लिंग ( ३८) बेर्नार्ड स्कॉल्जच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर ओ'ब्रायन २५ व कर्णधार अँडी बाल्बिर्नी २१ धावा करून माघारी परतले. 

० बाद ६२ वरून आयर्लंडचा डाव जो गडगडला तो कुणाला सावरताच आला नाही. आयर्लंडला २० षटकांत ८ बाद १२५ धावा करता आल्या. नामिबियाच्या जॅन फ्रायलिंकनं २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या. डेव्हिड विजेनं दोन, जजे स्मित व बेर्नार्ड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. आता नामिबियाला Super 12 मध्ये एन्ट्री घेण्यासाठी १२६ धावा करायच्या आहेत. 

प्रत्युत्तरात सलामीवीर क्रेग विलियम्स १५ धावांवर माघारी परतला. झेन ग्रीन हाही २४ धावाच करू शकला. पण, कर्णधार गेऱ्हार्ड इरास्मूस व डेव्हिड विज यांनी धमाकेदार खेळी करताना आयर्लंडचं कंबरडं मोडलं. विजनं १४ चेंडूंत १ चौकार व २ षटकार खेचून नाबाद २८ धावा केल्या, तर कर्णधार गेऱ्हार्डनं ४९ चेंडूंत ३ चौकार १ षटकारांसह ५३ धावांची महत्त्वाची खेळी केली. नामिबियानं १८.३ षटकांत २ बाद १२६ धावा करून विजय पक्का केला. नामिबियानं या विजयासह ग्रुप अ मध्ये दुसरे स्थान पक्के करून Super 12मध्ये प्रवेश मिळवला.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आयर्लंड
Open in App