Join us  

T20 World Cup, NAM vs SCO : नामिबियानं ऐतिहासिक विजय मिळवला, जे टीम इंडियाला अजून नाही जमलं तेही करून दाखवलं 

T20 World Cup, NAM vs SCO : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच Super 12मध्ये प्रवेश करणाऱ्या नामिबियानं बुधवारी ऐतिहासिक विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 10:52 PM

Open in App

T20 World Cup, NAM vs SCO : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच Super 12मध्ये प्रवेश करणाऱ्या नामिबियानं बुधवारी ऐतिहासिक विजय मिळवला.  नामिबियानं Round 1मध्ये नेदरलँड्सला पराभूत करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यानंतर त्यांनी आयर्लंडला नमवून थेट Super 12 मध्ये धडक दिली होती. आज त्यांनी त्यांच्यापेक्षा तगडा प्रतिस्पर्धी स्कॉटलंडचा पराभव केला. या विजयासह नामिबियानं Group 2 मध्ये २ गुणांची कमाई करताना .५५० नेट रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. टीम इंडिया, न्यूझीलंड आणि स्कॉटलंड यांची पाटी अजून कोरीच आहे. स्कॉटलंडचा हा सलग दुसरा पराभव ठरल्यानं त्यांचे Semi Finalमधील आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या स्कॉटलंडचे तीन फलंदाज पहिल्याच षटकात माघारी परतले. नामिबियाचा जलदगती गोलंदाज रुबेन ट्रम्पलमॅननं ( Ruben Trumpelmann ) यानं पहिल्याच चेंडूवर जॉर्ज मुन्सी ( ०) चा त्रिफळा उडवला. तिसऱ्या चेंडूवर कॅलम मॅकलीओड ( ०) यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर रिची बेरींगटन ( ०) हाही बाद झाला.  रुबेननं पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत इतिहास घडवला. पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या षटकात तीन विकेटस् घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. या धक्क्यांतून सावरताना स्कॉटलंडनं मिचेल लिस्क ( ४४) व ख्रिस ग्रेव्हेस ( २५) यांच्या भागीदारीच्या जोरावर ८ बाद १०९ धावांपर्यंत मजल मारली. लिस्कनं २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचले होते. नामिबियाकडून रुबेननं १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याला जॅन फ्रायलिंक ( २-१०), जेजे स्मिथ ( १-२०) व डेव्हिड विज (  १-२२) यांची उत्तम साथ मिळाली 

प्रत्युत्तरात क्रेग विलियम्स व मिचेल व्हॅन लिंगेन यांनी नामिबियाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण, शाफियान शरिफनं लिंगेनला १८ धावांवर बाद केले. झेन ग्रीन ( ९) व कर्णधार गेरहार्ड इरास्मस ( ४) हे झटपट माघारी परतल्यानं नामिबियाची अवस्था बिकट झाली होती. विलियम्सन २३ धावांवर माघारी गेल्यानंतर त्यांचा पाय आणखी खोलात गेला. मात्र, डेव्हिड विज व जेजे स्मिथ यांनी खंबीरपणे सामना केला. विज फॉर्मात होताच आणि त्याची विकेट मिळवण्यासाठी स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी सर्व प्रयत्न केले. अखेर विजयासाठी अवघ्या ७ धावा हव्या असताना विज १६ धावांवर बाद झाला, परंतु स्मिथनं नाबाद ३२ धावा करून नामिबियाला ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. स्मिथनं विजयी धाव हवी असताना खणखणीत षटकार खेचला. 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतन्यूझीलंड
Open in App