ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत Round 1 मध्येच धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्कॉटलंडनं बांगलादेशला नमवले आणि आज नामिबियानं T20 World Cup स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद करताना नेदरलँड्सचा पराभव केला. अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं २० षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात नामिबियानं १९ षटकांतच हे लक्ष्य पार केले. नामिबियाच्या या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला तो अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विज ( David Wiese )... त्यानं ४० चेंडूंत नाबाद ६६ धावा करताना विजय मिळवून दिला. नामिबियाचा हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील पहिलाच विजय ठरला.
नेदरलँड्सकडून मॅक्स ओडोडनं ७० धावांची खेळी केली आणि कॉलिन एकरमॅननं ३५ धावा केल्या. डेव्हिडनं अर्धशतकी खेळी करताना ४ चौकार व ५ षटकार खेचून १६५च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. त्यानं कर्णधार गेरहार्ड एरासमस याच्यासह ९३ धावांची भागीदारी केली. एारसमसनं २२ चेंडूंत ३२ धावा केल्या. त्यानंतर जेजे स्मिटनं ८ चेंडूंत नाबाद १४ धावा केल्या. नामिबियाने ९ षटकांत ५२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या आणि तेव्हा ३६ वर्षीय विज फलंदाजीला आला आणि त्यानं नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी धुलाई केली. त्यानं २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आता त्यांना Super 12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयर्लंडला पराभूत करावे लागले.