T20 World Cup, NEW ZEALAND V NAMIBIA : नामिबियाला कमी लेखण्याची चूक न्यूझीलंडला महागात पडली. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर नामिबियानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांनी न्यूझीलंडला जणू संधीच दिली. नामिबियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना किवी फलंदाजांना जखडून ठेवले. मागच्या सामन्यात ९०+ धावा करणाऱ्या मार्टिन गुप्तीलनं सुरुवात तर दणक्यात केली, परंतु दक्षिण आफ्रिकेचा माजी आणि नामिबियाचा आजी खेळाडू डेव्हिड विज ( David Wiese) यानं किवींना पहिला दणका दिला. त्यानंतर नामिबियाच्या गोलंदाजांनी टप्प्याटप्यानं विकेट घेतल्या.
गुप्तील १८ धावांवर माघारी परतला. त्यापाठोपाठ दुसरा सलामीवीर डॅरील मिचेल ( १९) हाही बाद झाला. कर्णधार केन विलियम्सन व डेव्हॉन कॉनवे यांनी संयमी खेळ करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, केन फिरकीपटू गेरहार्ड इरास्मसच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला. बॅटची किनार घेत चेंडू यष्टींवर आदळला. त्याच षटकात गेरहार्डनं कॉनवेला ( १७) धावबाद केले. किवींचे ४ फलंदाज १४ षटकांत ८६ धावा करून माघारी परतले होते.
जेम्स निशॅम व ग्लेन फिलिप्स यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. निशॅम व फिलिप्स यांनी अखेरच्या पाच षटकांत १२च्या सरासरीनं धावा केल्या. निशॅम २२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारासह ३३ धावांवर नाबाद राहिला. फिलिप्सनं २१ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३९ धावा केल्या. न्यूझीलंडनं ४ बाद १६३ धावा केल्या. आता त्यांना नेट रन रेट सुधारायचा असल्यास नामिबियाला कमी धावांवर गुंडाळावे लागेल. पण नामिबियानं किवींना इतक्या कमी धावांवर रोखून टीम इंडीयाला नेट रन रेट मध्ये पुढे जाण्याची संधी दिली आहे.
नामिबियानं केली न्यूझीलंडला मदत...
सध्याच्या घडीला ग्रुप २ मधून दुसऱ्या स्थानासाठी अफगाणिस्तान व न्यूझीलंड यांच्यात खरी लढत आहे. त्यामुळे रविवारी होणारा अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड हा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ उर्वरित सामन्यात मोठ्या फरकानं विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आज न्यूझीलंड शारजात नामिबियाचा सामना करत आहे आणि न्यूझीलंडला नेट रन रेट सुधारून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी नामिबियाविरुद्ध १८० धावा करून प्रतिस्पर्धींना ११२ धावांपर्यंत रोखणे गरजेचे आहे. जर त्यांनी १५० धावा केल्या तर नामिबियाला ८१ धावांत रोखून नेट रन रेट सुधारता येणार आहे.
Web Title: T20 World Cup, NZ vs NAM : Namibia need 164 runs to create history. Certainly a tough Task for them against New Zealand bowlers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.