Join us  

T20 World Cup, NZ vs PAK Live : १९९२सालची पुनरावृत्ती होतेय! पाकिस्तानची १३ वर्षांनंतर फायनलमध्ये धडक, न्यूझीलंडची सहज हार

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:53 PM

Open in App

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर बाबर आजम व मोहम्मद रिझवान या जोडीने एकहाती विजय मिळवून दिला. कर्णधार बाबरने मोक्याच्या क्षणी सूर पकडला अन् अर्धशतकी खेळी करताना रिझवानसह विक्रम नोंदवला. न्यूझीलंडकडून विजयासाठी काही खास प्रयत्न होताना दिसलेच नाही. पाकिस्तानने सहज विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला आणि चाहत्यांना १९९२च्या वर्ल्ड कप विजयाच्या पुनरावृत्तीचे स्वप्न पडू लागले. 

 पाकिस्तान योद्ध्यासारखा खेळला! सुरेश रैनाकडून बाबर आजम अँड टीमचे कौतुक

पहिल्याच षटकात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. फिन अॅलन ( ४), डेव्हॉन कॉनवे ( २१) व ग्लेन फिलिप्स ( ६) हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन व डॅरील मिचेल यांन डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. शाहिन आफ्रिदीने १७व्या षटकात ही जोडी तोडली. केन ४६ धावांवर माघआरी परतला. शाहिनने आज २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर मिचेलने पाचव्या विकेटसाठी जिमी निशॅमसह २२ चेंडूंत ३५ धावा चोपल्या. मागील वर्ल्ड कपमध्येही त्याने उपांत्य फेरीत अर्धशतक पूर्ण केले होते. मिचेल ३५ चेंडूंत ३ चौकार व १षटकारासह ५३ धावांवर नाबाद राहिला. जिमी निशॅमनेही नाबाद १६ धावा केल्या.  न्यूझीलंडने ४ बाद १५२ धावा उभ्या केल्या. 

पाकिस्तानसाठी हे लक्ष्य सहज शक्य दिसत होते आणि बाबर आजमनला पहिल्या षटकात जीवदान मिळाले. ट्रेंट बोल्टने टाकलेला चेंडू बाबरच्या बॅटची किनार घेत यष्टीरक्षक कॉनवेच्या दिशेने गेला, परंतु कॉनवेचा अंदाज चुकला व बाबरला जीवदान मिळाले. बाबर व मोहम्मद रिझवान ही जोडी न्यूझीलंडवर भारी पडली होती. पाकिस्तानचे हे दोन्ही फलंदाज सहज धावा करत होते. पाकिस्तानने ६ षटकांत एकही विकेट न गमावता ५५ धावा केल्या.  या जोडीकडून न्यूझीलंडच्या आत्मविश्वासाला तडा देण्यास सुरुवात झाली. या दोघांना कोणत्या रणनीतीने रोखावे हेच केनला समजत नव्हते. या दोघांनी पहिल्या १० षटकांत ८७ धावा फलकावर चढवल्या आणि त्यांना पुढील १० षटकांत केवळ ६६ धावाच करायच्या होत्या. बाबरने ३८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. बाबर व रिझवान यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०मधील आठवी व वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरी शतकी भागीदारी पूर्ण केली. वर्ल्ड कपमध्ये ३ शतकी भागीदारी करणारी ही पहिलीच जोडी ठरली.  १३व्या षटकात ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर बाबरने खणखणीत फटका मारला, परंतु डॅरील मिचेलने सोपा झेल टिपला. बाबर ४२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावा करून माघारी परतला. पाकिस्तानला ४३ चेंडूंत ४८ धावा करायच्या होत्या आणि बाबरच्या विकेटने न्यूझीलंडच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, रिझवानने ३६ चेंडूंत ट्वेंटी-२०तील २३वे अर्धशतक पूर्ण करताना पाकिस्तानला विजयी मार्गावर कायम राखले. 

१७व्या षटकात रिझवान बाद झाला. बोल्टनेच ही विकेट मिळवून दिली आणि ग्लेन फिलिप्सने झेल टिपला. रिझवान ४३ चेंडूंत ५७ धावांवर माघारी परतला. मोक्याच्या क्षणी किवींनी ही महत्त्वाची विकेट मिळवली. फुलटॉस चेंडू असल्याने झेल घेतल्यानंतरही किवींनी रिझवानला रन आऊट केले. पण, अम्पायर्सनी तो नो बॉल दिला नाही आणि नवा फलंदाज स्ट्राईकवर आला. आता किवी गोलंदाज दबाव तयार करताना दिसले. मोहम्मद हॅरिसने चौकार-षटकार खेचून पाकिस्तानवरील सर्व दडपण दोन चेंडूंत हलके केले. विजयासाठी २ धावा हव्या असताना हॅरीस ३० धावांवर ( २ चौकार व १ षटकार) बाद झाला. पाकिस्तानने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. १३ वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२०  वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला. २००९ मध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता.

१९९२च्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती?

  • १९९२च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसारखा योगायोग २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये जुळून येतोय. तो वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आला होता. ९२ मध्येही पाकिस्तानला भारताकडून पराभूत व्हावे लागले होते आणि सर्वात कमी पॉईंट्ससह पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता. 
  • १९९२च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला होता आणि अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर वर्ल्ड कपही जिंकला होता. त्यामुळे आता पाकिस्तानच्या चाहत्यांना वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पडत आहे. भारत-इंग्लंड यांच्यातला विजेता अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना करेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानन्यूझीलंड
Open in App