T20 World Cup, NEW ZEALAND V SCOTLAND : टीम इंडियाचे सर्व चाहते आज न्यूझीलंड-स्कॉटलंड लढतीत स्कॉटलंडच्या बाजूनं होती. स्कॉटलंडच्या विजयासाठी भारतीय चाहत्यांनी प्रार्थना केली, परंतु त्यांना यश आलं नाही. न्यूझीलंडच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडनं अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. अवघ्या १६ धावांनी त्यांना हार मानावी लागली, परंतु या धावांची तफावत कमी राखल्यानं किवींना नेट रन रेट सुधारता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाला त्याचा फायदा उचलता येऊ शकतो, फक्त अफगाणिस्ताननं किवींना पुढील सामन्यात हरवायला हवं.
प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॅरील मिचेल ( १३), केन विलियम्सन ( ०) व डेव्हॉन कॉनवे ( १) हे आज फार कमाल करू शकले नाही. पण, मार्टिन गुप्तील ( Martin Guptill) हा एकटा भिडला. या सामन्यात त्यानं तुफान फटकेबाजी केली. त्यानं ५६ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारासह ९३ धावा केल्या. न्यूझीलंडनं ५ बाद १७२ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १५० षटकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. या सामन्यात त्यानं विराट कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३०००+ धावांचा पल्लाही पार केला. १९व्या षटकात शतकाच्या उंबरठ्यावर गुप्तील बाद झाला.
प्रत्युत्तरात स्कॉटलडंकडून चांगली सुरुवात झाली. कायले कोएत्झर ( १७) धावफलकावर २१ धावा असताना माघारी परतला, जॉर्ज मुन्सी ( २२) व मॅथ्यू क्रॉस यांनी सुरेख फटकेबाजी केली. क्रॉसनं किवी गोलंदाज अॅडम मिल्नेच्या एका षटकात सलग पाच चौकार खेचून क्लास दाखवला. मुन्सीनंही चांगले षटकार खेचले. इश सोढीनं ही जोडी तोडली आणि मुन्सी झेलबाद झाला. ११व्या षटकात टीम साऊदीनं स्कॉटलंडला मोठा धक्का दिला, क्रॉस २७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रिची बेरींग्टन ( २०) व कॅलम मॅकलिओड ( १२) यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु इश सोढी व ट्रेंट बोल्टनं त्यांना बाद केलं. मिचेल लिक्सनं काही उत्तुंग फटके मारून स्कॉटलंडच्या फॅन्सचं मनोरंजन केलं. लिक्सनं २० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद ४२ धावा केल्या.
स्कॉटलंडला ५ बाद १५६ धावा करता आल्या आणि न्यूझीलंडनं हा सामना १६ धावांनी जिंकला. ट्रेंट बोल्ट व इश सोढी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. स्कॉटलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांनी पराभवाच्या धावांची मर्यादा कमी राखल्यानं न्यूझीलंडला नेट रन रेटमध्ये फटका बसला. त्यांच्या खात्यात ४ गुण व ०.८१६ नेट रन रेट आहे.
Web Title: T20 World Cup, NZ vs SCO : New Zealand beat Scotland by 16 runs, Good for India - the margin of win for New Zealand is reducing
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.