T20 World Cup, Pakistan vs Australia Live Update : नाणेफेकीचा कौल विरोधात जाऊनही पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सकारात्मक सुरुवात केली. कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) मारलेला कव्हर ड्राईव्ह डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. मोहम्मद रिझवाननं ( Mohammad Rizwan) सावध सुरुवातीनंतर पहिलाच चेंडू उत्तुंग टोलावला. डेव्हिड वॉर्नरनं तो टीपण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आलं. बाबर-रिझवान ही जोडी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा धैर्यानं सामना करताना दिसली आणि स्टेडियमवर पाकिस्तानच्या पाठिराख्यांची संख्याही अधिक असल्यानं त्यांच्या प्रत्येक रनवर जल्लोष होत होता.
बाबरनं सुरेख खेळ करताना यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला. त्यानं जोस बटलरला ( २६९ धावा) मागे टाकले आहे.पाकिस्तानकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही बाबरच्या नावावर आहे. पण, यापेक्षा एक मोठा विक्रम नावावर करताना त्यानं पाकिस्तानचे सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज मॅथ्यू हेडन याचा विक्रम मोडला. पहिल्याच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये बाबरनं आता २८०* धावा केल्या आहेत. पहिलाच वर्ल्ड कप खेळताना सर्वाधिक २६५ धावांचा विक्रम हेडनच्या नावावर होता.
यासह बाबरनं आजच्या सामन्यात ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २५०० धावांचा पल्लाही ओलांडला. त्यानं ६२ डावांमध्ये हा पराक्रम करताना विराट कोहलीचा ( ६८ डाव) आणखी एक विक्रम मोडला.