T20 World Cup, Pakistan vs Australia Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ वेगळ्याच संकटात सापडला आहे. बुधवारी पाकिस्तानचे दोन प्रमुख फलंदाज मोहम्मद रिझवान व शोएब मलिक यांचा अचानक ताप आला आणि त्यांना संघातील अन्य खेळाडूंपासून वेगळं ठेवलं गेलं. पाकिस्तानच्या या दोन्ही खेळाडूंनी सराव सत्रातही सहभाग घेतला नाही. या दोघांच्या तापामुळे पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना कोरोना चाचणी करावी लागली. पण, या सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि रिझवान व मलिक यांच्या प्रकृतीबाबतही मोठे अपडेट्स Geo News ने दिले आहेत.
बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शोएब मलिक, मोहम्मद हाफिज, आसिफ अली हे चांगल्या फॉर्मात आहेत. शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ, हसन अली, शाबाद खान, इमाद वासीम हेही उत्तम गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला त्यांना नमवणे सोपं नक्की नसेल. पण, Semi Finalच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आणि त्यांचं टेंशन वाढलं.
सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये मोहम्मद रिझवान २१४ धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक ९९.०० ची सरासरी घेऊन मलिक अव्वल क्रमांकावर आहे. मलिकनं स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. शोएब मलिकने टी-२० विश्वचषकामध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्यामध्ये भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याची बरोबरी केली.
रिझवान व मलिक हे दोघेही पाकिस्तान संघासाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांचे आजच्या सामन्यात खेळणं अत्यंत महत्त्वाचे आहे. पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनानं सर्फराज अहमद व हैदर अली यांना तयार राहण्यास सांगितले होते, परंतु Geo News नं दिलेल्या अपडेट्स नुसार रिझवान व मलिक बरे झाले असून ते आजच्या सामन्यात खेळणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.