T20 World Cup, PAK vs AUS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ पाकिस्तान उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शोएब मलिक, मोहम्मद हाफिज, आसिफ अली हे चांगल्या फॉर्मात आहेत. शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ, हसन अली, शाबाद खान, इमाद वासीम हेही उत्तम गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला त्यांना नमवणे सोपं नक्की नसेल. पण, Semi Finalच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे फॉर्मात असलेले फलंदाज शोएब मलिक व मोहम्मद रिझवान या दोघांना 'ताप' आला आहे आणि दोघांनीही आजच्या सरावसत्रात सहभाग घेतला नाही.
पाकिस्ताननं ग्रुप १ मध्ये भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया यांच्यावर विजय मिळवून १० गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये बाबर २६४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद रिझवान २१४ धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे. या जोडीनं भारताविरुद्ध १५२ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. सर्वाधिक ९९.०० ची सरासरी घेऊन मलिक अव्वल क्रमांकावर आहे. मलिकनं स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. शोएब मलिकने टी-२० विश्वचषकामध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्यामध्ये भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याची बरोबरी केली आहे. लोकेश राहुलनेसुद्धा स्कॉटलंडविरुद्ध १८ चेंडूत ५० धावा फटकावल्या होत्या.
मलिक व रिझवान यांच्या प्रकृतीबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) अद्याप कोणतेही अपडेट्स दिलेले नाहीत. परंतु पाकिस्तानी पत्रकार एहसान कुरेशी यांनी केलेल्या ट्विटनं ही बातमी समोर आली आणि या दोघांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. आता उद्याच्या लढतीपूर्वी त्यांच्या फिटनेसची तपासणी केली जाईल. ही दोघं न खेळल्यास पाकिस्तानला मोठा धक्का बसू शकतो.