T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला. पाकिस्तानच्या धावांपेक्षा त्यांनी पहिल्या १० षटकांत १८ धावा अधिक केल्या, परंतु त्यांनी दोन अतिरिक्त विकेट गमावल्या. त्यातील एक विकेट पाकिस्ताननं चिटींग करून मिळवली की डेव्हिड वॉर्नरच्या चुकीनं मिळवली, हा चर्चेचा विषय ठरतोय. ११व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शादाब खाननं ही विकेट घेतली, परंतु त्यावरून गोंधळ सुरू झालाय..
कर्णधार बाबर आजम ( Babar Azam), मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) आणि फाखर जमान ( Fakhar Zaman) या त्रिकुटानं आज ऑस्ट्रेलियाची वाट लावली. बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. बाबरनं पहिल्या विकेटसाठी रिझवानसह ७१ धावा जोडल्या. ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, ट्वेंटी-२०तील त्याचे हे ११ वे तर या वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, पुन्हा एकदा शाहिन आफ्रिदी प्रतिस्पर्धींसाठी कर्दनकाळ ठरला. त्यानं पहिल्याच षटकात ऑसी कर्णधार अॅरोन फिंच याला भोपळ्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि मिचेल मार्श यांनी ऑसींचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. शादाब खाननं ७व्या षटकात मार्शला ( २८) माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथही ( ५) काही कमाल न करता शादाबच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण, वॉर्नर सुसाट होता आणि त्यानं मोहम्मद हाफिजला मारलेला षटकार तर त्याहुन भन्नाट होता. वॉर्नर ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार मारून ४९ धावांवर माघारी परतला. शादाबनं टाकलेला चेंडू वॉर्नरच्या बॅटच्या बाजूनं जात यष्टिरक्षक मोहम्मद रिझवाच्या हाती विसावला अन् जोरदार अपील झाली. अम्पायरनं वॉर्नरला बाद दिलं अन् तोही काही विचार न करता निघाला. पण, रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागलाच नसल्याचे दिसले आणि चर्चेला विषय मिळाला. शादाबनं २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलही ७ धावांवर माघारी परतला.