T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) या जोडीनं २०२१वर्ष गाजवलंय. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यांचा हाच दबदबा पाहायला मिळाला आणि आजच्या Semi Final लढतीत त्यांनी ऑस्ट्रेलियालाही नाही सोडलं. बाबरनं सकारात्मक सुरुवात करून दिल्यानंतर रिझवाननं तुफान फटकेबाजी केली. रिझवानला रोखणे ऑसी गोलंदाजांना अवघड जात होते. तो सहजतेनं चेंडू प्रेक्षकांममध्ये टोलवत राहिला आणि पाकिस्ताननं मोठा पल्ला गाठला. बाबरची तंत्रशुद्ध फलंदाजी, रिझवानची वादळी खेळी अन् फाखर जमानचा फिनिशिंग टच... हे सर्व आज अस्सल क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारे ठरले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बाबरचा प्रत्येक फटका परफेक्ट होता. बाबर-रिझवान जोडी चोरटी धाव घेत ऑसी गोलंदाजांना हैराण करत होती. सुरुवातीला सावध खेळणाऱ्या रिझवाननं दाणपट्टा सुरू केला अन् चौकार-षटकार खेचले. फिरकीपटू अॅडम झम्पानं ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. १०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाबरनं टोलावलेला चेंडू लाँग ऑनला डेव्हिड वॉर्नरनं टिपला अन् पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. बाबरनं पहिल्या विकेटसाठी रिझवानसह ७१ धावा जोडल्या.
झम्पाच्या पुढच्या षटकात खणखणीत षटकार खेचून त्यानं वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १००० धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. कसोटीत असा पराक्रम २००६मध्ये मोहम्मद युसूफनं ( १७८८) आणि वन डे त १९९८मध्ये सचिन तेंडुलकरनं ( १८९४) केला होता. रिझवाननं ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, ट्वेंटी-२०तील त्याचे हे ११ वे तर या वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. झम्पानं ४ षटकांत २२ धावांत १ विकेट घेतली. जोश हेझलवूडनं टाकलेल्या १७व्या षटकात रिझवान व फाखर जमान यांनी २१ धावा कुटल्या. हेझलवूडनं ४ षटकांत ४९ धावा दिल्या. मिचेल स्टार्कनं १८व्या षटकात रिझवानची विकेट मिळवली. तो ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला. पण, पुढचाच चेंडू जमाननं प्रेक्षकांमध्ये भिरकावला. स्टार्कच्या त्या षटकात १५ धावा आल्या.