Join us  

T20 World Cup, PAK vs AUS Semi Final  : २०१० मध्ये माईक हसी अन् २०२१ मध्ये मॅथ्यू वेड; ऑस्ट्रेलियाच्या 'डाव्यां'नी पाकिस्तानची जिरवली

T20 World Cup, PAK vs AUS Semi Final  : अतिशय थरारक झालेल्या सामन्यात पहिल्याच पराभवात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियानं दाखवला बाहेरचा रस्ता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:07 AM

Open in App

पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला. पाकिस्तानच्या धावांपेक्षा त्यांनी पहिल्या १० षटकांत १८ धावा अधिक केल्या, परंतु त्यांनी दोन अतिरिक्त विकेट गमावल्या. टप्प्याटप्प्यानं विकेट पडूनही ऑस्ट्रेलियानं त्यांच्या धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) फटकेबाजीनंतर मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis ) आणि मॅथ्यू वेड ( Matthew Wade) यांनी सहाव्या विकेटसाठी तुफानी खेळी केली. पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचाही ऑसींना फायदा झाला. विश्वचषकाच्या कोणत्याही नॉक आऊट स्पर्धेत आजवर पाकिस्तानला (Pakistan) ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करता आला नाही. एकदिवसीय किंवा टी २० विश्वचषक पाकिस्तानला कायमच ऑस्ट्रेलियासमोर पराभव पत्करावा लागला आहे. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तेच झालं. मॅथ्यू वेडनं सामन्यात जबरदस्त फटकेबाजी करत पाकिस्तानला धुळ चारली.

२०२१ मध्ये डावखुऱ्या मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीनं पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. तर यापूर्वी २०१० मध्ये विश्वचषक सामन्यामध्ये मायकेल हसीनं २४ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी करत पाकिस्तानला धुळ चारली होती. तर यावेळी मॅथ्यू वेडनं १७ चेंडूंमध्ये ४१ धावा करत पाकिस्तानला थेट घरचाच रस्ता दाखवला. मॅथ्यू वेडच्या खेळीनं २०१० मधल्या मायकेल हसीच्या खेळीची आठवण आणून दिली.

यापेक्षा एक विशेष बाब म्हणजे दोन्ही खेळाडूंनी षटकार ठोकतच सामना जिंकवला होता. मायकेल हसीनं २०१० मध्ये झालेल्या टी २० विश्वचषक सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये ३ षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता मॅथ्यू वेडच्या रूपानं झाली. मॅथ्यू वेडनं पाकिस्तानविरोधातील सामन्यात १९ व्या ओव्हरमध्ये ३ षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

३२ चेंडून अर्धशतकी भागीदारीमॅथ्यू वेड व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाच्या आशा कायम राखताना सहाव्या विकेटसाठी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हसन अलीनं १८व्या षटकात १५ धावा दिल्या आणि आता ऑसींनी १२ चेंडूंत २२ धावा करायच्या होत्या. शाहिननं १९वे षटक फेकले. पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसच्या बॅटला कड लागून तो रिझवानच्या हाती विसावला, परंतु त्याआधी टप्पा पडल्यानं स्टॉयनिसला जीवदान मिळालं. तिसऱ्या चेंडूवर हसन अलीनं मॅथ्यू वेडचा झेल सोडला अन् पाकिस्तानवर दडपण निर्माण झालं. अनुभवी फलंदाज शोएब अलीला धीर द्यायला धावला. पुढच्या चेंडूवर वेडनं मारलेला स्कूप षटकार अप्रतिम होता. पाचव्या चेंडूवर वेडनं आणखी एक षटकार खेचून ७ चेंडू ६ धावा असा सामना जवळ आणला. वेडनं सलग तिसरा षटकार खेचून ऑस्ट्रेलियाला ५ विकेट व ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App