T20 World Cup, Pakistan vs Bangladesh : नेदरलँड्सने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा शेवट गोड केला अन् उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर फेकला. या निकालाने बांगलादेश व पाकिस्तानच्या आशा पल्लवीत झाल्या. हाताशी आयती आलेली संधी पाकिस्तानने न सोडण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अम्पायर्सच्या काही निर्णयाचा पाकिस्तानला फायदा झाला आणि एकूणच नेदरलँड्स व अम्पायर यांच्या कृपेने पाकिस्तान ग्रुप २ मधून टॉप फोअरमध्ये पोहोचला.
अम्पायरचा निर्णय अंतिम! भारताला No Ball दिल्याने गळा काढणाऱ्या पाकिस्तानची कोलांटी उडी, Video
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास व मजमुल होसैन शांतो यांनी दमदार सुरुवात केली. शाहिन आफ्रिदीने लिटन दास ( १०)ला शान मसूदच्या हाती झेलबाद केले. शांतो पाकिस्ताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता. शांतो आणि सौम्या सरकार यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढवली. शादाबने सौम्याला बाद केले आणि त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसनला LBW केले. DRS घेतल्यानंतर शाकिब बाद नसल्याचे स्पष्ट दिसत होते, तरीही तिसऱ्या अम्पायरने त्याला बाद दिले. यावरून वाद सुरू आहे.
शांतोची दमदार खेळी इफ्तिखार अहमदने संपुष्टात आणली. शांतो ४८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर त्रिफळाचीत झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले आणि बांगलादेशच्या धावांवर लगाम लावली. आफ्रिदीने २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. १ बाद ७३ वरून बांगलादेशची अवस्था ८ बाद १२८ अशी झाली. आफिफ होसैननं नाबाद २४ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात तिसऱ्याच चेंडूवर मोहम्मद रिझवानचा सोपा झेल टाकला. त्यानंतर रिझवान व कर्णधार बाबर आजम यांनी अर्धशतकी भागीदारी केली. आजमने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच दुहेरी आकडा पार केला.
नसूम अहमदने ५७ धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का दिला. आजम २५ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ रिझवान ( ३२) इबादत होसैनच्या गोलंदाजीवर बाद झाला. हे दोघंही बाद झाले तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी ६७ धावांची गरज होती आणि बांगलादेशचे गोलंदाज दडपण वाढवताना दिसले. अम्पायरच्या कामगिरीवर आज शाकिब फार काही खूश दिसला नाही. DRS साठी त्याने १५ सेकंदाच्या आत मागणी केली, परंतु अम्पायरने त्याच्याकडे पाहिलेच नाही आणि बांगलादेशला DRS घेता आला नाही. त्यानंतर शाकिबचा पारा आणखी चढला.
India vs Pakistan Final?
- ग्रुप १ मधून न्यूझीलंडने अव्वल स्थानासह, तर इंग्लंडने दुसऱ्या क्रमांकासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रुप २ मधून भारत व पाकिस्तान हे उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करून दुसऱ्या स्थानासह सेमीत प्रवेश केला, तर भारत झिम्बाब्वेला नमवून टेबल टॉपर होत उपांत्य फेरीत जाईल.
- अशा परिस्थितीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड अशा उपांत्य फेरीच्या लढती अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला होतील. उपांत्य फेरीत भारत व पाकिस्तान यांनी बाजी मारली तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल India vs Pakistan अशी होईल आणि त्याचीच क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"