Join us  

T20 World Cup, PAK vs SA : पाकिस्तान जिंकला, पावसाने आफ्रिकेचा घात केला! पाहा भारत Semi त कोणाला भिडणार?

पाकिस्तानचे ४ फलंदाज ४३ धावांवर माघारी परतल्यानंतरही शादाब खान व इफ्तिखार अहमद यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना बेक्कार धुतले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 5:42 PM

Open in App

T20 World Cup, Pakistan vs South Africa : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मार्गात पाऊस पुन्हा शत्रू बनून उभा राहिला आहे. पाकिस्तानचे ४ फलंदाज ४३ धावांवर माघारी परतल्यानंतरही शादाब खान व इफ्तिखार अहमद यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना बेक्कार धुतले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर शाहिन शाह आफ्रिदीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत आफ्रिकेला जबरदस्त धक्के दिले. टेम्बा बवुमा व एडन मार्कराम यांनी डाव सावरला, पण पावसाने आफ्रिकेचा खेळ बिघडवला. बराच वेळ वाया गेल्यानंतर १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित लक्ष्य आफ्रिकेला दिले गेले आणि पाकिस्तानने इथेच संधी साधली.

पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचला, तर ती अन् मी...! पावसामुळे वाढलं फॅनचं धाडस

 

मोहम्मद रिझवान ( ४), बाबर आजम ( ६) व शान मसूद ( २) हे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले.  मोहम्मद हॅरीस व इफ्तिखार अहमद यांनी डाव सावरला, परंतु हॅरिसच्या ( २८) रुपाने पाकिस्तानला ४३ धावांवर चौथा धक्का बसला.  मोहम्मद नवाजने २८ धावा करताना इफ्तिखारसह ३९ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इफ्तिखार व शादाब यांनी ३५ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली. शादाबने २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली. इफ्तिखारही ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा कुटल्या. पाकिस्तानने ४ बाद ४३ वरून ९ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला. एनरिच नॉर्खियाने ४ विकेट्स घेतल्या. 

क्विंटन डी कॉक ( ०) व रिली रोसोवू ( ७ ) यांना शाहिन आफ्रिदीने माघारी पाठवल्यानंतर शादाब खानने मोठे धक्के दिले. टेम्बा बवुमाने १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह ३६ धावा केल्या आणि २० धावा करणाऱ्या एडन मार्कराम यांना शादाबने माघारी पाठवल्याने आफ्रिकेची अवस्था ९ षटकांत ४ बाद ६९ अशी झाली. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिका १६ धावांनी पिछाडीवर होता. पाऊस थांबल्यानंतर आफ्रिकेसमोर १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले आणि त्यानुसार त्यांना ३० चेंडूंत ७३ धावा करायच्या होत्या.

हेनरिच क्लासेन व त्रिस्तान स्तब्स  यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण, शाहिनने १५ धावांवर क्लासेनला माघारी पाठवले. मोहम्मद वासीमने १२व्या षटकात आफ्रिकेला धक्का दिला आणि त्यांना १२ चेंडूंत ४३ धावा करायच्या होत्या.  नसीम शाहने १३व्या षटकात विकेट घेऊन आफ्रिकेचा पराभव निश्चित केला. ६ चेंडूंत ४१ धावांचे लक्ष्य आफ्रिकेलाही पेलवणारे नव्हते. हॅरीस रौफने १४व्या षटकात २ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेला ९ बाद १०८ धावा करता आल्या आणि पाकिस्तानने हा सामना ३३ धावांनी ( DLS)  जिंकून ग्रुप २ चे गणित रंगतदार बनवले आहे. 

भारतासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंड/ऑस्ट्रेलियाचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे ग्रुप २ मधील चित्र बदलण्याची शक्यता बळावली आहे. आफ्रिकेने अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून ७ गुणांसह उपांत्य फेरीत जाईल. भारत अखेरची लढत ( झिम्बाब्वे)  जिंकून ८ गुणांसह टेबल टॉपर होईल. अशा परिस्थितीत ग्रुप १ मधून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एकाशी होईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका
Open in App