T20 World Cup, Pakistan vs South Africa : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मार्गात पाऊस पुन्हा शत्रू बनून उभा राहिला आहे. पाकिस्तानचे ४ फलंदाज ४३ धावांवर माघारी परतल्यानंतरही शादाब खान व इफ्तिखार अहमद यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना बेक्कार धुतले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर शाहिन शाह आफ्रिदीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत आफ्रिकेला जबरदस्त धक्के दिले. टेम्बा बवुमा व एडन मार्कराम यांनी डाव सावरला, पण पावसाने आफ्रिकेचा खेळ बिघडवला.
मोहम्मद रिझवान ( ४), बाबर आजम ( ६) व शान मसूद ( २) हे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. मोहम्मद हॅरीस व इफ्तिखार यांनी काही काळ डाव सावरला, परंतु हॅरिसच्या ( २८) रुपाने पाकिस्तानला ४३ धावांवर चौथा धक्का बसला. मोहम्मद नवाजने २८ धावा केल्या आणि इफ्तिखारसह त्याने ३९ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इफ्तिखार व शादाब यांनी ३५ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलले. शादाबने २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली. इफ्तिखारही ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा कुटल्या. पाकिस्तानने ४ बाद ४३ वरून ९ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला. एनरिच नॉर्खियाने ४ विकेट्स घेतल्या.
क्विंटन डी कॉक ( ०) व रिली रोसोवू ( ७ ) यांना शाहिन आफ्रिदीने माघारी पाठवल्यानंतर शादाब खानने मोठे धक्के दिले. टेम्बा बवुमाने १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह ३६ धावा केल्या आणि २० धावा करणाऱ्या एडन मार्कराम यांना शादाबने माघारी पाठवल्याने आफ्रिकेची अवस्था ९ षटकांत ४ बाद ६९ अशी झाली. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिका १६ धावांनी पिछाडीवर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"