T20 World Cup, PAK vs NZ : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियानंतर आमचा कट्टर प्रतिस्पर्धी असेल तो न्यूझीलंडचा संघ, असा दावा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानं स्पर्धेपूर्वी केला होता. त्यामागे कारणंही तसंच होतं. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी दाखल झाला होता. पहिला वन डे सामना सुरू होण्यास काही तासच शिल्लक असताना न्यूझीलंड संघानं दौरा रद्द केला. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडनं माघार घेत मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडनंही आगामी पाक दौरा रद्द केल्याचे जाहीर केले. न्यूझीलंडचे हे वागणे पाकिस्तानच्या चाहत्यांना आवडले नाही आणि त्यामुळेच अख्तरनं हे विधान केलं. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत काल पाकिस्ताननं विजय मिळवताच न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाकिस्तानी चाहत्यांनी डिवचलं...
पाकिस्तान संघानं पुन्हा एकदा गोलंदाजांच्या जोरावर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅरीस रौफनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडला ८ बाद १३४ धावा करता आल्या. मिचेल ( २७), केन विलियम्सन ( २५), डेव्हॉन कॉनवे ( २७) यांची झुंज दाखवली. शाहिन शाह आफ्रिदी ( १-२१), इमाद वासीम ( १- २४) आणि मोहम्मद हाफिज ( १-१६) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. बाबार आजम व मोहम्मद रिझवान ही जोडीच पाकिस्तानला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण, ते अपयशी ठरले. पाकिस्तानचा निम्मा संघ ८७ धावांवर माघारी अनुभवी शोएब मलिक ( Shoaib Malik) व आसिफ अली ( Asif Ali) यांनी सहाव्या विकेटसाठी दमदार भागीदारी करून पाकिस्तानला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर न्यूझीलंडचा संघ पॅव्हेलियनच्या दिशेनं जात असताना पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांना पाहून 'Security, Security' अशी बोंब ठोकली. पाक दौरा रद्द केल्याचा राग त्यांनी व्यक्त केला. पण, ते हे विसरले की याच केन विलियम्सननं एकेकाळी त्याच्या मॅच फीचे हजारो डॉलर हे पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना दान म्हणून दिले होते. २०१४मध्ये केन व अॅडम मिल्ने यांनी त्यांची मॅच फीची रक्कम दान केली होती.