Rohit Sharma T20 World Cup 2024: गेले वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी चांगले गेले नाही. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण यंदा भारतीय संघाला जूनमध्ये टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे. यादरम्यान, चाहत्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न होता की, या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार?
रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हे कर्णधारपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, याबाबत आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी खुलासा केला आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना जय शाह यांनी पुढील टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे.
राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (SCA) क्रिकेट स्टेडियमचे नामकरण माजी प्रथम श्रेणी खेळाडू आणि वरिष्ठ प्रशासक निरंजन शाह यांच्या नावावर करण्यात आले आहे. यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये जय शाह यांनी निरंजन शाह स्टेडियमच्या नावाचे अनावरण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जय शाह यांनी विश्वचषक २०२३ च्या फायनलमधील पराभवाबद्दल सांगितले. तसेच २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी कर्णधाराच्या नावाची घोषणा केली.
जय शाह म्हणाले, 'विश्वचषकातबाबत मी काहीही का बोलत नाही, या माझ्या विधानाची सर्वजण वाट पाहत होते. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की २०२३ मध्ये अहमदाबादमध्ये सलग १० सामने जिंकून आम्ही विश्वचषक जिंकला नसला तरी आम्ही मन जिंकले आहे. पण मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही २०२४ मध्ये बार्बाडोसमध्ये भारतीय ध्वज नक्कीच फडकवू."
दरम्यान, भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या तिसऱ्या कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडू निवडताना कर्णधार रोहित शर्माची कसोटी लागणार आहे. कारण विराट कोहली, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर सारखे खेळाडू उपलब्ध नसल्याने भारतीय संघाचे संतुलन बिघडले आहे. विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे आणि श्रेयस अय्यरने दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून माघार घेतली आहे. तर लोकेश राहुल चौथ्या कसोटीमधून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.