T20 World Cup : भारतीय संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक झाली, परंतु बुधवारी त्यांनी अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत राखल्या आहेत. पाकिस्तानकडून १० विकेट्सनं आणि न्यूझीलंडकडून ८ विकेट्सनं हार मानल्यानंतर टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवला. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या फलंदाजीच्या क्रमात केलेल्या बदलावरून प्रचंड टीका होतेय. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा निर्णय महेंद्रसिग धोनीचा ( MS Dhoni) असू शकत नाही, हे स्पष्ट करताना विराट कोहलीवर ( Virat Kohli) टीका केली.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर कर्णधार कोहलीनं दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. त्यानं सूर्यकुमार यादवच्या जागेवर इशान किशनला, तर भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दूल ठाकूरला संघात घेतले. हे ठीक होतं, परंतु रोहितला सलामीला हटवून इशान व लोकेश राहुल यांना पाठवल्यानं, सर्वांनी आश्चर्य व्यक्त केला. रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आहे. हा निर्णय चुकीचा ठरला. गौतम गंभीरनं TOI ला लिहिलेल्या स्तंभलेखात म्हटले की, विराट कोहलीचे डावपेच मला कधीच प्रभावित करू शकले नाहीत. पुन्हा एकदा त्यानं मला निराश केलं. पाकिस्तानविरुद्ध पराभूत झालेल्या संघात बदल का केला, हेच समजले नाही आणि तेही एवढ्या महत्त्वाच्या स्पर्धेतील सुरुवातीच्याच सामन्यांत.''
गंभीरनं यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या बाजूनं वक्तव्य केलं. तो म्हणाला,''मी धोनीसोबत बरीच वर्ष खेळलो आहे आणि संघात लगेच बदल करू नये, हे धोनी चांगलं जाणतो. एका सामन्यानंतर संघात बदल करणारा तो नाही. त्यामुळे तो निर्णय धोनीचा असू शकत नाही आणि सहाय्यक स्टाफही विराट कोहलीच्या निर्णयावर त्यांचं मत मांडत नाहीत.''