T20 World Cup, AUSTRALIA V ENGLAND : इंग्लंडनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्स व ५० चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय ठरला आणि त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान हे जवळपास निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा हा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ( चेंडूंच्या फरकानं ) सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला आणि या निकालानं ऑस्ट्रेलियानं स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला.
इंग्लंडनं केला ऑस्ट्रेलियाचा चुराडा...
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस बोलावले आणि त्यांच्या गोलंदाजांनी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे हे चार दिग्गज २१ धावांवर माघारी पाठवून इंग्लंडनं सामना सुरुवातीलाच आपल्या मुठीत घेतला. अॅरोन फिंच ४४ धावा करून एकटा संघर्ष करताना दिसला. गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या ख्रिस वोक्सनं घेतलेला झेल अफलातून ठरला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १२५ धावांत तंबूत परतला. ख्रिस जॉर्डननं ३, वोक्सनं २ आणि टायल मिल्सनं २ विकेट्स घेतल्या. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना जेसन रॉय व जॉस बटलर यांनी ६६ धावांची सलामी दिली. रॉय ( २२) माघारी परतला. बटलर ३२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ७१ धावांवर नाबाद राहिला. बेअरस्टो १६ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडनं ११.४ षटकांत २ बाद १२६ धावा केल्या.
डेव्हिड मिलर ठरला किलर, दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेच्या हातून सामना खेचला...डेव्हिड मिलरनं ( David Miller) अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून दक्षिण आफ्रिकेला थरारक विजय मिळवून दिला. श्रीलंकेच्या वनिंदू हससरंगानं हॅटट्रिक घेत सामना फिरवला होता, पण मिलरच्या फटकेबाजीनं आफ्रिकेनं ४ विकेट्स व १ चेंडू राखून सामना जिंकला. पथूम निसंकानं ५८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ७२ धावा करत श्रीलंकेला १४२ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमानं ४६ धावा करून संघर्ष केला. मिलरनं १३ चेंडूंत २ षटकार खेचून नाबाद २३ धावा करत सामना जिंकला.
ग्रुप १ मधील परिस्थिती काय?
इंग्लंडनं सलग तीन विजय मिळवून ६ गुण व ३.९४८ अशा नेट रन रेटसह अव्वल स्थान मजबूत केलं आहे. या गटातून इंग्लंडचे उपांत्य फेरीतील स्थान पक्केच झाले आहे. इंग्लंडला उर्वरित दोन सामन्यांत श्रीलंका व दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे आणि एक विजय पुरेसा आहे. दारूण पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट -०.६२७ असा झाला आहे. त्यांच्या खात्यात ४ गुण असले तरी आता त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिका हा तगडा स्पर्धक उभा राहिला आहे. आफ्रिकेनं आज श्रीलंकेला पराभूत करून ०.२१० नेट रन रेट व ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला आता उर्वरित दोन सामन्यांत बांगलादेश व वेस्ट इंडिजाचा सामना करायचाय व त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. आफ्रिकेसमोर बांगलादेश व इंग्लंडचे आव्हान आहे.
Web Title: T20 World Cup Points Table: This massive England win has destroyed Australia's NRR and will serve as a massive boost for the chances of both South Africa and West Indies
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.