नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅस्ट्रेलियात रंगणारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदकडून (आयसीसी) याविषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून असे झाल्यास यंदा इंडियन प्रीमियर लीग २०२० चे आयोजन आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
२०२१ ला भारतात टी २० विश्वचषक असल्याने २०२० चा विश्वचषक २०२२ मध्ये घेण्यात येईल, अशा चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र सर्व चर्चांवर आयसीसीने अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही.विश्वचषकाचे आयोजन २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येईल का, हे अद्याप निश्चित नाही. दुसरा निष्कर्ष असाही काढला जात आहे की विश्वचषक रद्द झाल्यास भारत यावर्षाअखेरीस आॅस्ट्रेलियाचा दौरा करेल. या दौऱ्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलियावरील आर्थिक संकट दूर सारणे सोपे होणार आहे.
आयसीसी क्रिकेट समितीची नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावरदेखील चर्चा झाली. त्यानुसार टी-२० विश्वचषक हा नियोजित आॅक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत खेळवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले होते. (वृत्तसंस्था)
आयसीसीकडून इन्कार
‘आॅस्ट्रेलियात होणाºया टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२० या स्पर्धेच्या तारखा लांबणीवर टाकण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. या स्पर्धेबाबत मुद्दा आज (२८ मे) होणाºया आयसीसी बैठकीत चर्चेसाठी उपस्थित करण्यात येणार आहे. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल,’ असे स्पष्टीकरण आयसीसीच्या प्रवक्त्याने दिले.
या मुद्यांवर असेल फोकस
क्रिकेट आॅस्ट्रेलिया फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान टी-२० विश्वचषकाचे आयोजन करू शकते. पण त्या काळात असलेला इंग्लंडचा भारत दौरा आणि त्यानंतर आयपीएल २०२१ चे आयोजन करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत स्टार इंडियाला भारताच्या उभय देशातील मालिकेच्या प्रसारणाचे हक्क आणि आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क अशा दोन्ही गोष्टी सोपविण्यास ब्रॉडकास्टर्स विरोध करू शकतात.
२०२१ च्या टी-२० क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये २०२१ च्या विश्वचषकाचे यजमानपद आॅस्ट्रेलियाला देऊन २०२२ चे टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत स्वत:कडे घेण्याचा पर्याय आहे. मात्र बीसीसीआय टीम इंडियाच्या आॅस्ट्रेलिया दौºयासाठी सध्या क्रिकेट आॅस्ट्रेलियाला मदत करत आहे. अशा परिस्थितीत विश्वचषक स्पर्धांच्या आयोजनाची अदलाबदली करण्यास भारत कितपत तयार होईल याबाबत साशंकता आहे. बीसीसीआयने यासंदर्भात नकारार्थी भूमिका घेतल्याचे कळते.
आॅस्ट्रेलियाने थेट २०२२ चा विश्वचषक आयोजित करण्याचा विचार करावा. तथापि आयसीसीने २०२२ मधील मोठ्या स्पर्धांच्या घोषणा अद्याप तरी केलेल्या नाहीत.