T20 World Cup, Prize money: ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ८ विकेट्स राखून विजय मिळवून प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. न्यूझीलंडचे १७३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. किवींकडून कर्णधार केन विलियम्सन एकटा खेळला, तर ऑसींसाठी डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांची बॅट तळपली. वॉर्नरनं अर्धशतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाचा पाया रचला आणि त्यावर मिचेल मार्शनं कळस चढवला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं आयसीसीनं विजेत्या संघासाठी जाहीर केलेलं १२.२ कोटींचं बक्षीसही नावावर केलं.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) यानं ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूनंच त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडनं २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ( ५) अपयशी ठरला. डॅरील मिचेलनं अप्रतिम झेल टिपला. १५ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. वॉर्नर ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. मार्श ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलनं नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत ८ विकेट्स राखून विजय मिळवला.
बक्षीस रक्कमची विभागणी...
- आयसीसीनं जाहीर केलेल्या बक्षीस रकमेनुसार विजेत्या संघाला १२.२ कोटी, उपविजेत्याला ६.०१ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. उपांत्य फेरीतील पराभूत दोन संघांना प्रत्येकी ३ कोटी दिले जातील. आता या कोट्यवधींच्या शर्यतीतून टीम इंडिया बाद झालीय... पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांना आता कोटीच्याकोटींची उड्डाणं घेता येणार आहेत.
- आयसीसीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी ४२.०७ कोटींची बक्षीसं जाहीर केली आहेत. सुपर १२ मध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला विशिष्ट रक्कम ठरवली गेली आणि त्यानुसार ९.०१ कोटींची एकूण बक्षीस रक्कम वितरीत केली गेली. Super 12मधीय प्रत्येक विजयाला ३० लाख रुपये बक्षीस म्हणून दिले गेले.
- त्यानुसार भारतीय संघाला प्रती विजय ३० लाख असे एकूण ९० लाख रुपये बक्षीस रक्कम मिळाली. पाकिस्ताननं पाच सामने जिंकून १.५० कोटी रुपये कमावले आहेत. त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांना ३ कोटी असे एकूण ४.५० कोटी बक्षीस रक्कम मिळाली.