ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या नवव्या आवृत्तीत विजेत्या संघाला किमान २.४५ दशलक्ष डॉलर ( INR २०.३६ कोटी) बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षीस रक्कम आहे. २९ जून रोजी बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे फायनल होणार आहे आणि विजयी ट्रॉफीसह संघ मालामाल होणार आहे. IPL विजेत्या संघाला २० कोटी रुपये बक्षीस रक्कम म्हणून दिले जातात.
या स्पर्धेसाठी अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा असे २० संघ पात्र ठरले आहेत. २० संघांची प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी करण्यात आलेली आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका हे संघ असतील, तर ब गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान, क गटात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि ड गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ यांच्यात चुरस पाहायला मिळेल.
चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील आणि सुपर ८मध्ये ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी केली जाईल. यातील दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील आणि २९ जूनला फायनल होईल. उपविजेत्या संघाला किमान $१.२८ दशलक्ष ( INR १०.६४ कोटी) मिळतील, तर उपांत्य फेरीतील पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी $७८७,५०० ( INR ६.५४ कोटी) मिळतील. या स्पर्धेत एकूण $११.२५ दशलक्ष ( INR ९३.५१ कोटी) च्या एकूण ऐतिहासिक बक्षीस रक्कमेचे वाटप होईल. सुपर ८ मध्ये अपयशी ठरलेल्या चार संघांना प्रत्येकी $३८२,५००( INR ३.१७ कोटी) मिळतील.