क्रिकेट हा नाट्यमय खेळ आहे.. इथे क्षणाक्षणाला सामन्याची समीकरणं बदलतात... एखादा संघ सहज जिंकेल असे वाटत असताना एक चेंडू टर्निंग पॉइंट ठरतो. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड सहज विजय मिळवेल असे वाटत होते. न्यूझीलंडला २४ चेंडूंत ५७ धावा करायच्या होत्या, पण, ख्रिस जॉर्डनच्या एका षटकानं सारं चित्र बदललं. जिमि निशॅमनं तुफान फटकेबाजी करून २६ धावा कुटल्या आणि न्यूझीलंडनं ५ विकेट्स व ६ चेंडू राखून बाजी मारली. पण, याहीपेक्षा भारी सामना आज पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना फलंदाज फटका मारू शकला नाही आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती गेला. त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघानं विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली, परंतु त्यापुढे जे घडले त्यावर विश्वास बसवणे थोडं अवघड आहे.
आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अमेरिका क्वालिफायर सामन्यात हा थरार पाहायला मिळाला. अमेरिका व कॅनडा असा हा सामना रंगला होता. कॅनडानं २० षटकांत ५ बाद १४२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेनं कडवी टक्कर दिली. त्यांना अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावा करायच्या होत्या. पहिला चेंडू Wide ठरला, परंतु त्यावर धाव घेण्याच्या प्रयत्नात अमेरिकेचा फलंदाज धावबाद झाला. पुढच्या चेंडूवर दोन धावा आणि नंतर षटकार टोलावला गेला. अखेरच्या चेंडूवर अमेरिकेला ३ धावा करायच्या होत्या, परंतु फलंदाज फटका मारण्यापासून चुकला अन् चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. कॅनडाच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष केला अन् त्यावेळेत अमेरिकेच्या फलंदाजांनी दोन धावा धावून काढल्या. त्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला अन् अमेरिकेनं बाजी मारली.
पाहा व्हिडीओ...