अबूधाबी : पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका संघाने सलग दोन सामने जिंकत उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. आज होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही हेच विजयी अभियान कायम ठेवत उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित करण्याचा आफ्रिकेचा प्रयत्न असेल. कारण वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेवरील विजयामुळे दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीचा एक प्रमुख दावेदार बनला आहे. तसेच त्यांचा नेट रनरेटही ऑस्ट्रेलियापेक्षा सरस आहे.
दुसरीकडे बांगलादेशला आतापर्यंत झालेल्या तीनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र उरलेल्या दोन सामन्यात विजय मिळवून बांगलादेश बाकी संघाचे समीकरण बिघडवू शकते. दक्षिण आफ्रिकेचा संघ सलग दोन विजयामुळे उत्तम लयीत आला आहे. आफ्रिकेची गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे. कारण टी-२० जागतिक क्रमवारीत सध्या अव्वल क्रमांकावर असलेला तबरेज शम्सी संघासाठी उपयुक्त ठरतो आहे. सोबतच ऍन्रिक नॉर्खिया आणि ड्वेन प्रीटोरीयस या वेगवान गोलंदाजांची त्याला उत्तम साथ लाभते आहे.
कर्णधार तेेम्बा बहूमानेही मागच्या सामन्यात एक महत्त्वपर्ण खेळी केली आहे. मिलरही त्याच्या आधीच्या रूपात परतलेला दिसला. कामगिरीतील सातत्य हा आफ्रिकेसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. बांगलादेशला त्यांचे उर्वरित सामने शाकिबच्या अनुपस्थितीत खेळावे लागणार आहेत. अशात त्यांची भिस्त आता मुशफिकुर रहिम आणि महमदुल्लाह या अनुभवी खेळाडूंवर आहे. एकंदरीत, बांगलादेश सन्मान वाचवण्यासाठी तर आफ्रिका उपांत्य फेरी गाठण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.