T20 World Cup : टी-२० वर्ल्ड कपवर नाव कोरत टीम इंडियाने १७ वर्षांचा दुष्काळ संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक पटकावला. सर्वच भारतीयांसाठी हा क्षण अविस्मरणीय होता. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतणार होता. परंतु, बार्बाडोसला चक्रिवादळाचा तडाखा बसल्याने खेळाडू तिथेच अडकून पडले होते. अखेर आज (गुरुवारी, ४ जुलै) पहाटे टीम इंडिया मायदेशी परतली आहे.
टीम इंडियाचं मायदेशी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. चाहत्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. तर भारतात परतताच टीम इंडियाचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलबाहेर भांगडा करत त्यांचा आनंद व्यक्त केला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भारतीय क्रिकेट संघ भारतात परतल्यानंतरचे खास क्षणांचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव भांगडा नृत्य करताना दिसत आहेत. तर हार्दिक पांड्यानेही भांगडावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. ऋषभ पंतसह भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूदेखील भांगडा करताना दिसत आहेत. क्रिकेटर्सच्या या आनंदात चाहतेही सहभागी झालेले पाहायला मिळाले.
दरम्यान, बार्बाडोसमध्ये २०२४ च्या T20 कप फायनलमध्ये भारतीय संघाने २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. नियोजित वेळापत्रकानुसार भारतीय क्रिकेट संघाचे विमान ४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचले. आज संध्याकाळी ५:०० वाजता मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर विजय परेड करून हा विजय साजरा करण्यात येणार आहे.