T20 World Cup, SOUTH AFRICA V SRI LANKA : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आज जवळपास संपुष्टात आले असते, परंतु डेव्हिड मिलरनं ( David Miller) सामनाच फिरवला. श्रीलंकेनं उत्कृष्ट गोलंदाजी करताना आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवलाच होता. वनिंदू हसरंगानं ( Wanindu Hasaranga ) हॅटट्रिक घेत सामन्याला कलाटणी दिली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. पण, अखेरच्या षटकात मिलरच्या 'किलर' फटकेबाजीनं श्रीलंकेवर थरारक विजय मिळवला. या पराभवामुळे श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पथूम निसंकानं ५८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ७२ धावा करत श्रीलंकेला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर चरीथ असलंका ( २१) हा श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. दक्षिण आफ्रिकेनं त्यांचा डाव १४२ धावांवर गुंडाळला. ड्वेन प्रेटॉरियस ( ३-१७) व तब्रेझ शम्सी ( ३-१७) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. अॅनरिच नॉर्ट्जेनं दोन बळी टिपले.
लक्ष्याचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक ( १२), रिझा हेंड्रिक्स ( ११) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १६) यांना अपयश आल्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा यानं खिंड लढवत सामन्यात चुरस कायम राखली. पण, १८व्या षटकात सामन्यात ट्विस्ट आला. ४६ धावा करणारा बवुमा १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वनिंदू हसरंगाला विकेट देऊन माघारी परतला. त्यापाठोपाठ ड्वेल्ने प्रेटॉरियस बाद झाला. हसरंगानं १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एडन मार्करामला बाद केले होते आणि १८व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत त्यानं हॅटट्रिक पूर्ण केली. ब्रेट ली ( २००७) व कर्टीस कॅम्फेर ( २०२१) यांच्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला.
दक्षिण आफ्रिकेला अखेरच्य १२ चेंडूंत २५ धावांची गरज होती आणि डेव्हिड मिलर व कागिसो रबाडा क्रिजवर होते. दुष्मंथा चमिरानं १९व्या षटकात १० धावा दिल्या आणि सामना आता ६ चेंडू १५ धावा असा चुरशीचा झाला. रबाडानं २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाहिरु कुमाराच्या गोलंदाजीवर एक धाव घेत मिलरला स्ट्राईक दिली. मिलरनं दोन खणखणीत षटकार खेचून सर्व दडपण झुगारले. मिलरच्या दुसऱ्या षटकानंतर श्रीलंकन फॅन्स रडू लागले. ३ बाद दोन धावा असताना मिलरनं एक धाव घेतली आणि रबाडानं चौकार खेचून आफ्रिकेचा विजय पक्का केला.