T20 World Cup, SOUTH AFRICA V ZIMBABWE : पाऊस आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात छत्तीसचा आकडा असल्याचे पुन्हा एकदा दिसले. आफ्रिकेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ग्रुप २ मधील पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध ९-९ षटकांचा खेळ खेळावा लागला. झिम्बाबेने ८० धावांचे लक्ष्य समोर असताना क्विंटनने १२ चेंडूंत फलकावर ४० धाव चढवल्या. आफ्रिकेने ३ षटकांत ५१ धावा चढवल्या अन् पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यानंतर अम्पायर्सनी सामन रद्द करण्याचा निर्णय घेतला.
ग्रुप २ मधील दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे ९-९ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. रेगिस चकाब्वा ( ८ ), क्रेग एर्व्हिन ( २), सीन विलियम्स ( १) व सिकंदर रजा ( ०) हे चार फलंदाज १९ धावांत माघारी परतले. लुंगी एनगिडीने दोन, तर वेन पार्नेलने १ विकेट घेतली. डेव्हिड मिलरने डायरेक्ट हिटवर विलियम्सनला रन आऊट केले. वेस्ली माधेव्हेरे व मिल्टन शुम्बा यांनी झिम्बाबेसाठी लढत दिली. कागिसो रबाडाने टाकलेल्या ८व्या षटकात वेस्लीने १७ धावा कुटल्या आणि मिल्टनसह अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. वेस्लीने १८ चेंडूंत नाबाद ३५ धावा ( ४ चौकार व १ षटकार) आणि मिल्टनने १८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात क्विंटन डी कॉकने पहिल्याच षटकात ४,४,४,६,४,१ अशा २३ धावा चोपून काढताना झिम्बाब्वेच्या चाहत्यांना गप्प केले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकातील या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. पहिल्या षटकानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला अन् ५ मिनिटांत गेलाही. पण, आफ्रिकेसमोर ७ षटकांत ६४ झावांचे लक्ष्य ठेवले गेले आणि त्यांना ५.५ षटकांत ४० धावा करायच्या होत्या. नेमका किती षटकांचा सामना हे ठरवण्यात बराच वेळ वाया गेला अन् पुन्हा पाऊस सुरू झाला. क्विंटनने फटकेबाजी सुरूच ठेवली आणि ४ चौकार खेचून दोन षटकांत ४० धावा चढवल्या. या दोन षटकांत क्विंटनच्या ३९ धावा झाल्या आणि ट्वेंटी-२० पहिल्या दोन षटकांत सर्वाधिक ३३ धावांचा डेव्हिड वॉर्नरचा ( वि. वेस्ट इंडिज, २०१०) विक्रम मोडला गेला.
क्विंटन व टेम्बा बवुमाने ३ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यात क्विंटनच्या ४७ धावा होत्या. हा सामना रद्द झाल्याने आफ्रिका व झिम्बाब्वेला १-१ गुणावर समाधान मानावे लागले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"