T20 World Cup, SOUTH AFRICA V ZIMBABWE : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज ग्रुप २ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशने ९ धावांनी नेदरलँड्सवर विजय मिळवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्या फेरीतील बांगलादेशचा हा पहिलाच विजय ठरला. आजच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे यांच्यात ९-९ षटकांचा सामना सुरू आहे. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ७९ धावा केल्या.
ग्रुप २ मधील दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे ९-९ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. रेगिस चकाब्वा ( ८ ), क्रेग एर्व्हिन ( २), सीन विलियम्स ( १) व सिकंदर रजा ( ०) हे चार फलंदाज १९ धावांत माघारी परतले. लुंगी एनगिडीने दोन, तर वेन पार्नेलने १ विकेट घेतली. डेव्हिड मिलरने डायरेक्ट हिटवर विलियम्सनला रन आऊट केले. वेस्ली माधेव्हेरे व मिल्टन शुम्बा यांनी झिम्बाबेसाठी लढत दिली. कागिसो रबाडाने टाकलेल्या ८व्या षटकात वेस्लीने १७ धावा कुटल्या आणि मिल्टनसह अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. वेस्लीने १८ चेंडूंत नाबाद ३५ धावा ( ४ चौकार व १ षटकार) आणि मिल्टनने १८ धावा केल्या.
नेदरलँड्सने बांगलादेशच्या पोटात गोळा आणला... राऊंड १ मधून सुपर १२ मध्ये एन्ट्री घेणाऱ्या नेदरलँड्सने पहिल्याच सामन्यात तगड्या बांगलादेशला हिस्का दाखवला. पण, विजयापासून ऑरेंज आर्माला वंचित रहावे लागले. पॉल व्हॅन मिकेरेन ( २-२१) व बॅस डे लीड ( २-२९) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलीच, शिवाय त्यांना फ्रेड क्लासेन, टीम प्रिंगल, शरिज अहमद, लोगान व्हॅन बीक यांनी प्रत्येकी एक विकेट घेत उत्तम साथ दिली. बांगलादेशच्या अफिफ होसैनने सर्वाधिक ३८ धावा केल्या, तर नजमुल होसैन शांतो ( २५) व मुसाडेक होसैन ( २०*) यांनीही योगदान देत ८ बाद १४४ धावा केल्या. तस्कीन अहमदने पहिल्याच षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. कॉलिन एकरमनने अर्धशतकी खेळी करून नेदरलँड्सची खिंड लढवली होती. नेदरलँड्सला १३५ धावा करता आल्या. तस्कीनने ४ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"