T20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. या सामन्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच, उद्योगपती आनंद महिंद्रा आणि शशी थरूर यांनीही टीम इंडियाच्या पराभवानंतर संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या पराभवानंतर आनंद महिंद्रा यांनाही आपला राग लपवता आला नाही.
पराभवाचे दुःख नाही, पराभवाच्या पद्धतीचे... -भारताच्या पराभवानंतर, आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, पराभवामुळे दुःख होत नाही, पराभवाच्या पद्धतीमुळे होते. खेळाचे बदलते वारे क्रूर असू शकतात. आपण याकडे उगवण्याची आणखी एक संधी म्हणून पाहू. आनंद महिंद्रा हे या वर्लडकपमध्ये सुरुवातीपासूनच टीम इंडियाचा उत्साह वाढवत आहेत. मात्र, उपात्य फेरीत मिळालेल्या या पराभवाने ते दुःखी झाले आहेत.
शशी थरूर यांचेही ट्विट चर्चेत! -यातच काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही काहीसे असेच ट्विट केले आहे. मला पराभवामुळे काही फरक पडत नाही. जय आणि पराजय हा खेळाचा एक भाग आहे. खरे तर, आज भारताने स्पिरिट दाखवले नाही. ते खेळात दिसत नव्हते. शशी थरूर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. यावर युजर्स आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.
इग्लंडकडून भारताचा लाजिरवाणा पराभव - टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने 10 गडी राखून सहज विजय मिळवला.
भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांना इंग्लंडचा एकही बळी मिळवता आला नाही. अखेर इंग्लिश संघाने 16 षटकांतच 169 धावा करत फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडकडून सलामीवीर कर्णधार जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांनी अनुक्रनमे 80 आणि 89 धावांची नाबाद खेळी केली.