T20 World Cup, India vs Zimbabwe Live : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर १२च्या अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर अपेक्षित विजय मिळवला. रविवारच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने धक्कादायक निकालाची नोंद करताना दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर केले. त्यामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरीचे दार उघडे झाले. झिम्बाब्वे जाता जाता आणखी एक धक्का देतात की काय, अशी चर्चा होती. पण, भारतीय संघासमोर ते फिके ठरले. सूर्यकुमार यादवची झंझावती खेळी आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तगडे लक्ष्य उभे केले. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. भारताने या विजयासह ग्रुप २ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.
सूर्यकुमार यादव पाकिस्तानी रिझवानला पुरून उरला
भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेसमोर तगडे आव्हान उभे केले. रोहित शर्मा ( १५) पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. लोकेश राहुलने फटकेबाजी सुरू ठेवली आणि विराट कोहलीसह ( २६) दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. लोकेशने ३५ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. आज संधी मिळालेला रिषभ पंत ३ धावांवर माघारी परतला. सूर्यकुमार यादवने दमदार खेळ करताना यंदाच्या वर्षात १०००+ धावा पूर्ण केल्या. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय व पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननंतर जगातला दुसरा फलंदाज ठरला.
यंदाच्या वर्षात सूर्याने १००२* धावा करताना रिझवानला ( ९२४) मागे टाकले. हार्दिक पांड्या ( १८) बाद झाला. भारताने ५ बाद १८६ धावा केल्या, सूर्याकुमार २५ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर नाबाद राहिला.भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेचा ओपनर वेस्ली माधेव्हेरेला बाद केले. विराटने अफलातून झेल घेतला. त्यानंतर अर्शदीप सिंगने वेगवान चेंडू टाकून रेगीस चकाब्वाचा त्रिफळा उडवला. २ बाद २ धावा असताना क्रेग एर्व्हिन व सीन विलियम्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मोहम्मद शमीने तिसरी विकेट मिळवून दिली. विलियम्स ( ११) भुवीच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुढच्याच षटकात हार्दिक पांड्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत एर्व्हिनची ( १३) विकेट घेतली. शमीने आणखी एक धक्का देताना झिम्बाब्वेची अवस्था ५ बाद ३६ अशी केली.
३० चेंडूत ८३ धावा करायच्या होत्या आणि सिकंदरने जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतली. अश्विनने झिम्बाब्वेला सातवा धक्का देताना वेलिंग्टन मसाकाड्झाला ( १) बाद केले. तीन चेंडूंच्या अंतराने रिचर्ड एगाराव्हा ( १) याचा अश्विनने त्रिफळा उडवला. अश्विनने ४-०-२२-३ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. सिकंदर २४ चेंडूंत ३४ धावा करून माघारी परतला. हार्दिकने त्याला बाद केला. अक्षर पटेलने शेवटची विकेट घेतली आणि झिम्बाब्वेचा संघ ११५ धावांत माघारी परतला. भारताने ७१ धावांनी विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"