T20 World Cup, WEST INDIES V SRI LANKA : गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान ऑफिशिअली संपुष्टात आले. श्रीलंकेनं दर्जेदार कामगिरी करताना विंडीजवर २० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजायाचा श्रीलंकेला फार फायदा झाला नसला तरी त्यांनी ५ पैकी दोन सामने जिंकून स्पर्धेचा निरोप घेतला. विंडीजचा आणखी एक सामना शिल्लक आहे आणि त्यात ऑस्ट्रेलियावर मात करून ते ग्रुप १मधील उपांत्य फेरीचं समीकरण बिघडवू शकतील. श्रीलंकेच्या एका खेळाडून आपली छाप पाडताना सर्वांना आश्चर्यचकीत केलं. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं आयपीएलमध्ये केवळ दोन सामने खेळवून बाकावर बसवलेल्या या खेळाडूनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद केली.
श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण देणं विंडीजला महागात पडले. श्रीलंकेचे सलामीवीर पथूम निसंका आणि कुसल परेरा यांनी ४२ धावांची भागीदारी केली. परेरा २१ चेंडूंत २९ धावांवर माघारी परतला. निसंका व चरिथ असलंका यांनी दुसऱ्या विकेटसाठी वेस्ट इंडिजला रडवलं. निसंका ४१ चेंडूंत ५ चौकारांसह ५१ धावांवर माघारी परतला. असलंकानं ४१ चेंडूंत ८ चौकार १ षटकारासह ६८ धावा केल्या. कर्णधार दासून शनाकानं १४ चेंडूंत नाबाद २५ धावा करून संघाला ३ बाद १८९ धावा करून दिल्या.
प्रत्युत्तरात ख्रिस गेल ( १) व एव्हिन लुईस ( ८) ही जोडी पुन्हा अपयशी ठरली. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १३ वेळा एकेरी धावांवर बाद होण्याच्या शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी गेलनं बरोबरी केली. रोस्टन चेसही ९ धावांवर माघारी परतला. निकोलस पूरन व शिमरोन हेटमायर यांनी कडवा संघर्ष केला, परंतु त्यांना विजय साकारता आला नाही. पूरन ३४ चेंडूंत ६ चौकार १ षटकारासह ४६ धावांवर माघारी परतला. हेटमारयला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. आंद्रे रसेल( २), किरॉन पोलार्ड ( ०) , जेसन होल्डर ( ८) व ड्वेन ब्राव्हो ( २) यांनी मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. हेटमायर ५४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ८१ धावांवर नाबाद राहिला. पण, त्याला विंडीजला ८ बाद १६९ धावांपर्यंतच नेता आले. श्रीलंकेनं हा सामना २० धावांनी जिंकला.
या सामन्यात बिनुरा फर्नांडो ( २-२४), चमिका करुणारत्ने ( २-४३) आणि वनिंदू हसरंगा ( २-१९) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. वनिंदूनं आजही प्रभावी मारा केला आणि त्यानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या. पुरष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच पर्वात सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हसरंगाच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यानं श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसचा १५ विकेट्सचा ( २०१२ ) विक्रम मोडला. हसरंगानं या स्पर्धेत ३० षटकांमध्ये १५६ धावा देताना १६ विकेट्स घेतल्या.