T20 World Cup : पाकिस्तान संघानं पुन्हा एकदा गोलंदाजांच्या जोरावर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅरीस रौफनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या फलंदाजांची कामगिरी आज चांगली झाली नाही, परंतु अनुभवी शोएब मलिक ( Shoaib Malik) व आसिफ अली ( Asif Ali) यांनी सहाव्या विकेटसाठी दमदार भागीदारी करून पाकिस्तानला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयासह पाकिस्ताननं उपांत्य फेरीच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं आणि टीम इंडियाला Semi Final च्या शर्यतीत कायम राहण्यास मदत केली. पण, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं यावरून टीम इंडियाला टोमणा मारला.
ग्रुप २ मध्ये पाकिस्तान ४ गुण व ०.७३८ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहेत. अफगाणिस्तान १ विजयासह २ गुण व ६.५०० नेट रन रेटनं दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता अफगाणिस्तानचा सामना पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत, नामिबिया यांच्याशी आहे आणि यात त्यांनी धक्कादायक निकाल नोंदवल्यास भारत व न्यूझीलंड यांना धक्का बसू शकतो. टीम इंडियाला आता उर्वरित चारही सामन्यांत विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करता येणार आहे. जर न्यूझीलंडनं काल पाकिस्तानला पराभूत केलं असतं तर टीम इंडियाची अडचण वाढली असती. पाकिस्तानच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा झाला आहे.
आता दुसऱ्या संघासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात थेट लढत असेल. त्यामुळे ३१ तारखेचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारतानं हा सामना जिंकल्यास त्यांना उर्वरित लढतीत अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया यांना नमवून ८ गुणांसह सेमीफायनलचं गणित गाठता येईल. भारताविरुद्ध जर न्यूझीलंडनं विजय मिळवला, तर टीम इंडियाला उर्वरित तीनही सामने जिंकून काहीच उपयोग होणार नाही. अफगाणिस्ताननं काही पराक्रम केला, तर कदाचित संधी मिळू शकते.
शोएब अख्तर काय म्हणाला?''न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत संपूर्ण भारतवासी पाकिस्तन संघाच्या पाठीशी उभे होते. तर आम्ही ( पाकिस्तान) तुम्हाला ( भारत) वाचवलं, चांगले शेजारी हेच करतात. हे लक्षात ठेवा. आपल्या दोघांनाही अंतिम फेरीत खेळायचंय आणि जेतेपदाच्या लढतीत तुम्हाला टक्कर देण्यासाठी आम्ही तयार आहोत,''असे अख्तर म्हणाला.