लखनौ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान पायाला दुखापत झाल्याने भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज दीपक चाहरचा उर्वरित दोन सामने खेळण्याची शक्यता नाही. यामुळे भारतीय एकदिवसीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नऊ धावांनी पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा चाहर हा भाग नव्हता.
निवड प्रक्रियेची माहिती असलेल्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “दीपक चाहरचा पाय मुरगळला आहे. परंतु ही दुखापत तितकीसी गंभीर नाही. तथापि, त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला जाऊ शकतो.” “त्यामुळे दीपक चाहरला खेळवण्याची जोखीम घ्यायची की नाही हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल. कारण तो टी-20 विश्वचषकासाठी स्टँडबाय यादीत आहे. पण जर गरज असेल तर त्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महम्मद शमी तंदुरूस्त होत असल्यानं जसप्रीत बुमराहच्या जागी त्याला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. तसंच तो येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियालाही रवाना होण्याची शक्यता आहे. शमी जर फिट असला तर त्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुकेश चौधरी आणि चेतन साकारिया हे नेट गोलंदाज म्हणून टी-20 संघात सामील झाले आहेत. आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि सौराष्ट्रचा चेतन साकारिया हे नेट गोलंदाज म्हणून T20 विश्वचषक संघात सामील झाले आहेत.
दोघंही रवाना“मुकेश आणि चेतन हे टीमसोबत रवाना झाले आहेत. पर्थमध्ये भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. त्यावेळी ते संघासोबत असतील,” असंही सूत्रांनी सांगितलं. 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी दोन टी-20 सराव सामने खेळवले जाणार आहेत.