T20 World Cup : Team India kick start practice in UAE : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यांत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा सामना करणार आहे. उद्या भारत-इंग्लंड सामना होणार आहे आणि टीम इंडियानं आजपासून सरावाला सुरुवातही केली. विराट कोहलीचे ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत असणार आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीला पुन्हा निळ्या जर्सीत पाहून चाहते भारावले. विराटनंही धोनीच्या या नव्या भुमिकेबद्दल त्याचे मन मोकळे केले.
बीसीसीआयनं धोनीच्या नव्या भूमिकेतील फोटो पोस्ट केला आणि लिहिलं, ''किंग्सचे मनापासून स्वागत. टीम इंडियात महेंद्रसिंग धोनी परतला आणि तोही नव्या भूमिकेत.''
विराट कोहली काय म्हणाला?''महेंद्रसिंग धोनीकडे भरपूर अनुभव आहे आणि पुन्हा या वातावरणात परतण्यासाठी तो खूप उत्साहित होता. तो नेहमीच आमच्यासाठी एक मेंटॉर राहिला आहे. जेव्हा आम्ही आमच्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा तो खेळत होता आणि आता खेळत नसला तरी त्याला मार्गदर्शन करण्याची तिच संधी पुन्हा मिळाली आहे. विशेषतः युवा खेळाडू, ज्यांच्या कारकिर्दीची सुरुवात होत आहे, त्यांना धोनीच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून बरंच काही शिकायला मिळणार आहे,''असे विराटनं ICCला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.