T20 World Cup, Team India : भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेतील आव्हान आता अफगाणिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला रविवारी न्यूझीलंडकडूनही लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. सलग दोन पराभवांमुळे आता टीम इंडियाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणे जवळपास अवघडच आहे. तरीही भारतीय आशावादी आहेत आणि अफगाणिस्तानकडून टीम इंडियाला मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. भारताचा संघ सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत आहे आणि ही खरी संघासाठी डोकेदुखी बनलीय. पण, टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे आणि आता कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यातून कसा मार्ग काढेल, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
न्यूझीलंडविरुद्धही शरणागती...न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीचा क्रम बदलणे, टीम इंडियाला महागात पडले. इशान किशन व लोकेश राहुल या जोडीचा प्रयोग केला, परंतु तो फसला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहित शर्माला जीवदान मिळूनही काही खास करता आले नाही. कर्णधार विराट कोहली व रिषभ पंत यांनी दडपणात विकेट फेकल्या. हार्दिक पांड्या २३ व रवींद्र जडेजा नाबाद २६ धावा करून संघाला ७ बाद ११० धावांपर्यंत मजल मारून दिली. ट्रेंट बोल्ट ( ३-२०), इश सोढी ( २-१७) यांच्यासह टीम साऊदी ( १-२६), अॅडम मिल्ने ( १-३०) यांनीही चांगली गोलंदाजी केली. न्यूझीलंडनं डॅरील मिचेलनं ४९ धावा करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. मिचेल ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला आणि केनसह त्याची ७२ धावांची भागीदारीही संपुष्टात आलीकेन विलियम्सन ३३ धावांवर नाबाद राहिला आणि मार्टीन गुप्तील २० धावांवर बाद झाला. भारतासाठी दोन्ही विकेट्स जसप्रीत बुमराहनं घेतल्या.
पाकिस्ताननं दिला धक्का...ग्रुप २ मध्ये पाकिस्तान सलग तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे आणि त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले आहे. त्यात टीम इंडियाला सलग दोन पराभव पत्करावे लागले आहेत. न्यूझीलंडविरुद्धचा पराभव हा टीम इंडियाला महागात पडला आणि त्याचा पाकिस्तानला फायदा झाला. या लढतीपूर्वी आयसीसी ट्वेंटी-२० संघांच्या क्रमवारीत टीम इंडिया व पाकिस्तान २६५ रेटींग पॉईंटसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. पण, भारताचा पराभव झाला अन् पाकिस्तानचं फावलं.. भारताला तीन रेटींग पॉईंटचा फटका बसला अन् त्यांची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पाकिस्तानचा फॉर्म पाहता आता त्यांच्याकडून हे स्थान हिसकावणे टीम इंडियाला जमणे अवघड आहे.