Team India T20 World Cup: टीम इंडियाच्या वर्चस्वाचे दिवाळे! चुकीची संघ निवड, आयपीएल कारणीभूत

नवी दिल्ली : कर्णधार क्षमतेनुसार खेळत नाही, फॉर्म न बघता मोठ्या नावांच्या आधारे झालेली संघ निवड, बायोबबलमधील सततच्या वास्तव्यामुळे ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:14 AM2021-11-02T05:14:39+5:302021-11-02T05:15:13+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup: Team India's dominance fall, Wrong team selection, IPL causes | Team India T20 World Cup: टीम इंडियाच्या वर्चस्वाचे दिवाळे! चुकीची संघ निवड, आयपीएल कारणीभूत

Team India T20 World Cup: टीम इंडियाच्या वर्चस्वाचे दिवाळे! चुकीची संघ निवड, आयपीएल कारणीभूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : कर्णधार क्षमतेनुसार खेळत नाही, फॉर्म न बघता मोठ्या नावांच्या आधारे झालेली संघ निवड, बायोबबलमधील सततच्या वास्तव्यामुळे आलेला थकवा आणि आयपीएलला दिलेले अवास्तव महत्त्व यामुळे टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे पुरते पानिपत झाले. 
पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या नामुष्कीची एक ना अनेक कारणे देता येतील. हे केवळ पराभव नव्हते. खेळाडूंनी ज्या पद्धतीने लोटांगण घातले ते पाहून चाहत्यांसह आजी-माजी खेळाडूदेखील स्तब्ध झाले.

भारतीय खेळाडूंची देहबोली पाहून त्यांच्यावर बायोबबलमधील थकवा वरचढ झाल्याचे स्पष्ट जाणवत होते. विश्वचषकाआधी आयपीएल आयोजित करून खेळाडूंना ताजेतवाने राहण्याची संधी नाकारण्यात आली.

    संघाकडे असलेल्या सहयोगी स्टाफने रणनीती आखली नाही का? मेंटॉर धोनीने काय केले? नेतृत्व कुणाला जुमानत नाही काय? विराट कोहलीची ही कर्णधार म्हणून आयसीसीची अखेरची टी-२० स्पर्धा होती. वन डे आणि टी-२० विश्वचषकातील अपयशी कर्णधार असा कायमचा डाग त्याच्या कारकिर्दीवर लागणार आहे, त्याचे सर्व डावपेच फसले. 

    संघ निवडीतही सातत्य दिसले नाही. न्यूझीलंडविरुद्ध इशान किशनला सलामीला पाठविण्याचा कोहलीचा निर्णय चुकीचा सिद्ध झाला. अश्विनला प्रत्येक सामन्यातून बाहेर ठेवण्याच्या वृत्तीमुळे सहकाऱ्यांप्रति आकस सिद्ध झाला. हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये नाही हे दिसत असताना वारंवार प्राधान्य देण्यात आले. यामुळे विश्वचषकातील आव्हानांप्रति टीम इंडिया गंभीर 
नाही, हे सिद्ध झाले. 

    फॉर्मबाबत बोलायचे तर ऋतुराज गायकवाडला संधी मिळायला हवी होती. चुकीची संघ निवड केल्याबद्दल निवड समिती जबाबदार आहे. भुवनेश्वरपेक्षा दीपक चहर चांगला ठरू शकला असता. पॉवर प्लेमध्ये तो बळी घेऊ शकतो. युजवेन्द्र चहलकडे डोळेझाक करून राहुल चहरला संघात घेण्यात आले.

    फॉर्मबाबत बोलायचे तर ऋतुराज गायकवाडला संधी मिळायला हवी होती. चुकीची संघ निवड केल्याबद्दल निवड समिती जबाबदार आहे. भुवनेश्वरपेक्षा दीपक चहर चांगला ठरू शकला असता. पॉवर प्लेमध्ये तो बळी घेऊ शकतो. युजवेन्द्र चहलकडे डोळेझाक करून राहुल चहरला संघात घेण्यात आले.

एक चाहता म्हणाला,‘ भारतीय खेळाडूंनो तुमचे अभिनंदन ! तुम्ही फारच उर्मट झाला आहात ! चाहत्यांच्या भावना आणि अपेक्षांचे तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्ही स्वत:च्या हितासाठी आयपीएलमध्ये धडाका दाखवता. देशासाठी काही करण्याची इच्छा दिसत नाही.’ 
    अन्य एका चाहत्याने लिहिले, ’ फारच निराशादायी. या संघाकडून विश्वचषक जिंकण्याची अपेक्षा नाही. तुम्ही आयपीएलच खेळत राहा. कोहली तर सर्वांत खराब कर्णधार निघाला. संघ खेळताना पाहून ही आमचीच टीम इंडिया आहे काय?, असा प्रश्न पडतो.’

‘मेंटॉर’ धोनीचे काम काय?
    महेंद्रसिंग धोनीला मेंटॉर बनवून भारतीय संघाकडून विश्वचषकात ज्या कामगिरीची अपेक्षा बाळगण्यात आली, त्याच्या विपरित घडले आहे. याआधी विराटच्या नेतृत्त्वात भारताने आयसीसी स्पर्धा जिंकली नाही. मात्र, साखळीत चांगल्या कामगिरीच्या बळावर अखेरच्या चार संघात स्थान मात्र मिळविले होते. यंदा धोनी मेंटॉर असताना अखेरच्या चार संघात स्थान मिळविणे कठीण होत आहे. 
    ड्रेसिंग रुममधील तणाव दूर करण्याच्या हेतूने धोनीची नियुक्ती करण्यात आली, तरी मागच्या दोन्ही सामन्यात संघ दडपणात खेळला. पाकविरुद्ध भारतीय गोलंदाज दडपणात होते, तर न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजांनी पत घालवली. न्यूझीलंडविरुद्ध कोहलीवर फारच दडपण होते. त्याने रोहितऐवजी इशानला सलामीला पाठविले. स्वत: चौथ्या स्थानावर आला. धोनी कर्णधार होता. त्यावेळी त्याने असा क्रम कधीही बदलला नव्हता. काल फलंदाजी क्रम बदलणे धोनीची कल्पना होती?  किंवा मग त्याने स्वत: कुठलाही सल्ला दिलाच नाही? आयपीएलनंतर निवडकर्ते हार्दिक पांड्याला संघात कायम ठेवू इच्छित नव्हते. त्याच्या फॉर्म आणि फिटनेसवर नाराजी होती. पण धोनीने पांड्याचा बचाव केला. तो मॅचविनर आणि फिनिशर असल्याची सबब धोनीने निवडकर्त्यांना देत हार्दिकचा बचाव केल्याचे वृत्त नुकतेच मीडियात आले होते. धोनीला भारतीय संघाचे मेंडटॉर बनविण्याचा निर्णय आतापर्यंत तरी फसलेला दिसतो.

असे असेल पुढचे गणित!

उपांत्य फेरीचा प्रवास खडतर झाला असला तरी भारताला उपांत्य फेरी गाठता येण्याची शक्यता वाटते. 
    भारताने अफगाणिस्तानला ८० हून अधिक धावांनी, स्कॉटलंडला १०० हून अधिक धावांनी आणि नामीबियाला १०० हून अधिक धावांनी पराभूत करणे गरजेचे असेल.
    अफगाणिस्तानने देखील न्यूझीलंडला कमी अंतराने पराभूत करणे गरजेचे असेल.
    याशिवाय न्यूझीलंडने स्कॉटलंड आणि नामिबियाला जवळपास ५० धावांपेक्षा कमी धावांनी पराभूत केले तर भारताचे गणित जुळून येणे शक्य आहे.

Web Title: T20 World Cup: Team India's dominance fall, Wrong team selection, IPL causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.