गयाना - वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यातही भारतीय महिला संघाने आयर्लंडवर 52 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारताने दिलेल्या 145 धावांचे आव्हान पूर्ण करताना आयर्लंडच्या महिला संघाला 93 धावांपर्यंतच मजल मारता आली.
टी 20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 145 धावा केल्या होता. त्यामध्ये मिथाली राजने 56 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर स्मृती मंथानानेही 29 चेंडूत 33 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारताला 145 धावांचा पल्ला गाठता आला. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौरने केवळ 7 धावा काढल्या. आयर्लंडकडून किम गर्थने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
भारताने दिलेल्या 145 धावांचे लक्ष्य पूर्ण करताना आयर्लँडच्या संघाला 93 धावांपर्यंतच मजल मारता आली. आयर्लंडने 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्या 93 धावा केल्या. आयर्लंडकडून इसोबेल जोयसेने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर भारताकडून राधा यादवने सर्वाधिक 3 गडी बाद केले. दरम्यान, या विजयासह महिला टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एंट्री मिळवली आहे.