T20 World Cup : भारतीय संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल दमदार सुरू होती, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संघाचा खेळ थोडा विस्कळीत झालेला दिसतोय. बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मा अँड टीम पराभूत होता होता वाचली. बांगलादेशविरुद्ध अवघ्या ५ धावांनी भारताला विजय मिळवता आला होता. भारताच्या या कामगिरीवर माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) याने नाराजी व्यक्त केली आणि त्याने लिटन दासचे कौतुक केले.
"या सामन्यात बांगलादेशने ज्या प्रकारे झुंज दिली, जर पावसाने खेळात व्यत्यय आणला नसता तर सामना त्यांच्या बाजूने होता. पहिल्या सात षटकांमध्ये त्यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. यातून भारतीय गोलंदाजांनी बोध घ्यायला हवा. रोहित शर्मानेही सामन्यानंतर बांगलादेश भारतापेक्षा सरस असल्याचे मान्य केले. टीम इंडियासाठी हा वेक अप कॉल आहे. त्यांना सेमीफायनल आणि फायनल मध्ये सर्वोत्तम कामगिरी करायला हवी, कारण त्यांच्यासमोर अधिक कडवे आव्हान आहे,''असे रैना आज तकशी बोलताना म्हणाला.
सुरेश रैनाने भारताच्या फलंदाजांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला,"भारताचे आघाडीचे ५ फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. रोहित शर्माही धावा करत आहे. लोकेश राहुल फॉर्ममध्ये येणं हे टीम इंडियासाठी खूप चांगली गोष्ट आहे. एका सामन्यानंतर आम्ही सेमीमध्ये पोहोचू. विराट कोहलीचा चांगला फॉर्म सुरू आहे, सूर्यकुमार चांगला खेळत आहे. हार्दिक पांड्याही चांगली फलंदाजी करत आहे.''
माजी क्रिकेटपटूच्या म्हणण्यानुसार, झिम्बाब्वेविरुद्ध भारताने लेग-स्पिनर युझवेंद्र चहलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला पाहिजे. "अश्विनने मारलेला षटकारही भारतासाठी महत्त्वाचा होता. कदाचित त्यामुळेच संघ व्यवस्थापन अश्विनला पाठीशी घालत असेल. पण मला वाटते की चहलला संघात पुनरागमन करावे लागेल. पुढचा सामना मेलबर्नमध्ये आहे, जे एक मोठे मैदान आहे," रैनाने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"