India vs Pakistan match in the T20 World Cup : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातला हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. यूएईत होणाऱ्या या स्पर्धेकरिता स्टेडियमवर ७० टक्के प्रेक्षकक्षमतेला परवानगी देण्यात आली आहे. आयसीसीनंही तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे आणि भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं तासाभरात विकली गेली आहेत. २४ ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील, अशी शक्यता होती. पण, आयसीसीनं स्टेडियमच्या ७० टक्के प्रेक्षकक्षमतेला परवानगी दिली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ही २५,००० इतकी आहे आणि १८,५०० तिकिटं उपलब्ध होती. पण, तासाभरात ती विकली गेली आणि आता काही फॅन्स ब्लॅकनं तिकिट मिळतील का, अशी सोशल मीडियावर विचारणा करत आहेत. २०१९मध्ये मँचेस्टर येथे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान भारत-पाकिस्तान भिडले होते आणि त्यात टीम इंडियानं बाजी मारली होती.
क्रिकेट पाकिस्तान यांनी दिलेल्या वृत्तानुसार ३ ऑक्टोबरला तिकिटांच्या विक्रीला सुरूवात झाली आणि तासाभरात ती विकली गेली. जनरल, जनरल ईस्ट, प्रीमियम, पेव्हेलियन ईस्ट आणि प्लॅटिनम स्टँड्समध्ये बसून प्रेक्षकांना हा सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. आयसीसीनं तिकीट विक्रिला सुरुवात झाल्याची घोषणा करताच फॅन्स तुटून पडले. प्रीमियम तिकिट जवळपास ३० हजाराला विकलं गेलं, तर प्लॅटिनम तिकिट ५२,५०० ला विकलं गेलं आहे.
भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर
पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी