नवी दिल्ली : अखेर भारतीय क्रिकेटपटूंना जी भीती होती, ती खरी ठरली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी माहिती देत, यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची मोठी निराशा झाली आहे. भारतातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता नाइलाजाने बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला.
यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली यूएईमध्ये पार पडेल. गांगुली यांनी सांगितले की, ‘टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये होऊ शकते, असे आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) अधिकृतपणे सांगितले. याबाबत स्पर्धा आयोजनाचा पूर्ण ढाचा तयार करण्यात येत आहे.’ आयसीसीने या महिन्याच्या सुरुवातीलाच बीसीसीआयला टी-२० विश्वचषक आयोजनासंदर्भात निर्णय घेण्याबाबत चार आठवड्यांचा अवधी दिला होता. यासाठी आयसीसीने बीसीसीआयला देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यास सांगितले होते. त्यानुसारच बीसीसीआयने अखेर आपला निर्णय कळवला.
n यंदाची आयपीएलही कोरोनाच्या प्रकोपामुळे अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. त्यामुळेच टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आयपीएलचे उर्वरित सामनेही सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान यूएईमध्येच खेळविण्यात येणार आहेत.