नवी दिल्ली : भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचे आयोजन यूएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्याची तयारी होत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती चिंताजनक असल्याने बीसीसीआयने आयसीसीला अंतर्गत सूचना देत स्पर्धेची तयारी सुरू करण्यास होकार कळविला आहे.
या स्पर्धेसाठी यूएई हा नेहमी पसंतीचा पर्याय राहिला आहे. ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या विश्वचषकाचे सामने अबुधाबी, शारजा आणि दुबईसह ओमानची राजधानी मस्कट येथे होतील. आयसीसी बोर्डाच्या घटनाक्रमाची माहिती ठेवणाऱ्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, बीसीसीआयने औपचारिकरीत्या आयसीसी बोर्डाकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला असला तरी अंतर्गतरीत्या मात्र ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात आमची हरकत नसल्याचे कळविले आहे.
१६ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे सुरुवातीचे सामने यूएईसह मस्कटमध्ये होतील. यामुळे आयपीएलचे आयोजन करणाऱ्या तिन्ही मैदानांना सज्ज ठेवले जाईल. आयपीएल १० ऑक्टोबर रोजी संपल्यानंतर यूएईत विश्वचषकाचे सामने नोव्हेंबरमध्ये सुरू होतील. खेळपट्ट्या तयार करण्यासाठी तीन आठवडे मिळावेत, असा यामागील विचार आहे. यादरम्यान सुरुवातीचे सामने ओमानमध्ये खेळविले जाऊ शकतात.
आयसीसी बोर्डातील अनेक सदस्यांचे मत असे की भारत वेळकाढू धोरण अवलंबित आहे. ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असे भाकीत वर्तविण्यात येत असल्याने २८ जून रोजी विश्वचषक आयोजनाचा निर्णय बीसीसीआय कसा घेऊ शकेल?
पॅट कमिन्सची आयपीएलमधून माघार
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलमधील उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. तो केकेआरचा खेळाडू आहे. यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने कमिन्सच्या आयपीएल न खेळण्याविषयी माहिती दिली. ‘पॅट कमिन्स स्वत: म्हणाला की तो खेळायला येणार नाही. पण मॉर्गन येऊ शकतो. स्पर्धा सुरू होण्यास अजून वेळ आहे. जर मला कर्णधारपदासाठी विचारले गेले तर मी त्यासाठी तयार आहे,’ असे कार्तिकने एका वृत्तपत्राला सांगितले.
Web Title: T20 World Cup in UAE, Oman; Information that the BCCI has given internal instructions to the ICC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.