बार्बाडोसाच्या मैदानावर २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज मायदेशी परतला. खरे तर, हरिकेन बेरील श्रेणी-3 च्या वादळामुळे संघ मायदेशी परतण्यास 5 दिवसांचा विलंब झाला आहे. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर भारतीय संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर, भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर भारतीय संघ सायंकाळी मुंबईत दाखल झाला. यानंतर, मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. संपूर्ण संघ खुल्या बसमधून चाहत्यांना अभिवादन करत होता. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावेळी भारतीय संघाच्या खेळाडूंच्या हातात जी ट्रॉफी दिसत होती ती खरी अथवा ओरिजिनल ट्रॉफी नव्हती.
खरे तर, ही एक बऱ्याच वर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे. अंतिम सामन्यानंतर विजेत्या संघाला फोटो सेशनसाठी एक खरी अथवा ओरिजिनल ट्रॉफी दिली जाते. मात्र, त्यांच्या देशात घेऊन जाण्यासाठी एक प्रतिकृती विश्व कप ट्रॉफी दिली जाते. ही प्रतिकृती ट्रॉफी अगदी विश्वचषकाच्या ट्रॉफी प्रमाणेच असते. या प्रतिकृती ट्रॉफीवर संबंधित इव्हेंटच्या वर्षाचा लोगोही असतो.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, भारतीय संघासोबत प्रतिकृती ट्रॉफी आली, तर मग खरी ट्रॉफी कुठे? तर प्रथेनुसार, खरी ट्रॉफी केवळ फोटो सेशनसाठीच दिली जाते. यानंतर ती पुन्हा दुबई येथे ICC मुख्यालयी पाठवली जाते.