T20 World Cup, IND vs SCO : टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शुक्रवारी सर्व आघाड्यांवर बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीला फलंदाजांनीही साजेशा साथ देताना कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) वाढदिवसाचं गिफ्ट दिलं. भारतानं ८६ धावांचे लक्ष्य अवघ्या ६.३ षटकांत दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार करून नेट रन रेटच्या बाबतीत अफगाणिस्तान व न्यूझीलंड यांना मागे टाकलं. या ऐतिहासिक कामगिरीनंतर विराटनं ड्रेसिंग रुममध्ये केप कापून वाढदिवस दणक्यात साजरा केला.
सोशल मीडियावर विराटच्या या बर्थ डे सेलिब्रेशनचा १० सेकंदाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रवी शास्त्री यांच्यासह वरुण चक्रवर्थी, इशान किशन, रिषभ पंत दिसत आहेत. पण, एका युजर्सनं महेंद्रसिंग धोनी कुठेय असा प्रश्न विचारला आहे. विराटनं दरम्यान वाढदिवसाला विजय मिळवून मोठा विक्रम नावावर केला. वाढदिवसाला विजय मिळवणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
या सामन्यात जसप्रीत बुमराहनं १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा ( ३-१५) नं ट्वेंटी-२०तील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर मोहम्मद शमीनं ३ षटकांत १ निर्धाव षटक फेकताना १५ धावांत तीन विकेट्स घेतल्या. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर माघारी परतला. रोहित-राहुल जोडीनं चार षटकांत धावफलकावर अर्धशतकी धावा फडकवल्या. रोहित १६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर बाद झाला. राहुलनं १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. राहुलनं १९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. भारतानं हा सामना ८ विकेट्स व ८१ चेंडू राखून जिंकला. भारतानं ६.३ षटकांत २ बाद ८९ धावा केल्या.