ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाचा मानहानिकारक पराभव झाला. आता टीम इंडियाला Semi Final मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील आणि विराट सेनेचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीला ( Virat Kohli) धक्का बसला आहे आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत विराट कोहलीची घसरण झाली आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) यानं मोठी झेप घेतली आहे.
ICC men’s T20I Player Rankings आयसीसीनं जाहीर केलेल्या क्रमवारीत विराटची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे, तर लोकेश राहुल ( KL Rahul) आठव्या क्रमांकावर घसरला आहे. विराटनं पाकिस्तानविरुद्ध ४९ चेंडूंत ५७ धावा केल्या होत्या आणि कोहली ७२५ रेटींग पाँईंटसह पाचव्या क्रमांकावर आहे. राहुलला ३ धावाच करता आल्या होत्या आणि त्याचे रेटींग ६८४ इतकी आहे. याच सामन्यात रिझवाननं नाबाद ७९ धावांची खेळी केली आणि न्यूझीलंडविरुद्ध ३३ धावा केल्या. तो तीन क्रमांकाच्या सुधारणेसह चौथ्या स्थानी सरकला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम यानं ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध अनुक्रमे ४० व ५१ धावा केल्या होत्या आणि ८ क्रमांकाच्या सुधारणेसह तो तिसऱ्या स्थानी आला आहे. इंग्लंडचा डेविड मलान ( ८३१) व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( ८२०) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अफगाणिस्तानच्या रहमनुल्लाह गुर्बाज यानंही ९ क्रमांकाची झेप घेत कारकिर्दीत सर्वोत्तम १२वे स्थान पटकावले. बांगलादेशचा मोहम्मद नईम ११व्या स्थान सुधारणेसह १३व्या, नामिबियाचा कर्णधार गेऱ्हार्ड इरास्मुस ३७ व्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजांमध्ये बांगलादेशचा महेदी हसन १२व्या स्थानावर आला आहे. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहिन आफ्रिदी ११ स्थानाच्या सुधारणेसह १२व्या क्रमांकावर आला आहे.
Web Title: T20 World Cup : Virat Kohli Slips One Slot to 5th, KL Rahul Down to 8th Spot in ICC T20 Batter Rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.