दुबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप फायनल जिंकल्यावर ऑस्ट्रेलियावर लक्ष्मी प्रसन्न झाली. कांगारुंना 1.6 दशलक्ष डॉलर म्हणजेच 12 कोटी रुपये बक्षीस मिळाले. तर उपविजेत्या न्यूझीलंड टीमला 6 कोटी रुपये मिळाले. तर सेमी फायनलला हरलेल्या टीम इंग्लंड आणि पाकिस्तानला 4-4 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच तीन कोटी रुपये मिळाले.
तुम्ही म्हणाल एवढी कमी रक्कम. तर हो, जागतिक स्तरावरील या स्पर्धेचे बक्षीस प्रतिष्ठेच्या मानाने खूप कमी आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आयपीएलपेक्षा तर खूपच कमी. वर्ल्डकप पूर्वी आयपीएल स्पर्धा त्याच यूएईमध्ये पार पडली. त्या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्सला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. जे ऑस्ट्रेलियापेक्षा 8 कोटी रुपयांनी जास्त आहे. तर प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या आयपीएलच्या अन्य दोन टीमना प्रत्येकी 8.75 कोटी रुपये मिळाले होते. एवढेच नाही तर फायनल हरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला 12.5 कोटी रुपये मिळाले होते. ते देखील ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त आहेत.
आयसीसीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी ४२.०७ कोटींची बक्षीसं जाहीर केली आहेत. सुपर १२ मध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला विशिष्ट रक्कम ठरवली गेली आणि त्यानुसार ९.०१ कोटींची एकूण बक्षीस रक्कम वितरीत केली गेली. Super 12मधीय प्रत्येक विजयाला ३० लाख रुपये बक्षीस म्हणून दिले गेले. त्यानुसार भारतीय संघाला प्रती विजय ३० लाख असे एकूण ९० लाख रुपये बक्षीस रक्कम मिळाली. पाकिस्ताननं पाच सामने जिंकून १.५० कोटी रुपये कमावले आहेत. त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांना ३ कोटी असे एकूण ४.५० कोटी बक्षीस रक्कम मिळाली.