ठळक मुद्देतर किमान १० खेळाडू असे आहेत, ज्यांचे टीम इंडियातील स्थान निश्चित आहे. त्याचवेळी, इतर रिक्त स्थानांसाठी तब्बल १२ ते १५ खेळाडूंचा विचार होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे यूएईमध्ये आयोजन झाल्यानंतर काही दिवसांनीच येथेच टी-२० विश्वचषक स्पर्धेचा धमाका रंगणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी क्रिकेटविश्वातील सर्वच संघांनी कंबर कसली असून, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांनी आपापले संघ जाहीरही केले आहेत. इतर संघही काही दिवसांत जाहीर होतील, मात्र यामध्ये सर्वाधिक उत्सुकता लागून राहिली आहे ती टीम इंडियाची.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. त्यामुळेच कोणत्या खेळाडूला संधी मिळणार आणि कोणता खेळाडू संघाबाहेर बसणार यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत. भारतीय संघ सध्या क्रिकेटविश्वातील सर्वात तंदुरुस्त संघ म्हणून ओळखला जातो. जर प्रमुख खेळाडू पूर्ण तंदुरुस्त राहिले,
तर किमान १० खेळाडू असे आहेत, ज्यांचे टीम इंडियातील स्थान निश्चित आहे. त्याचवेळी, इतर रिक्त स्थानांसाठी तब्बल १२ ते १५ खेळाडूंचा विचार होईल.
या खेळाडूंची निवड पक्की !
कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा या दोन स्टार खेळाडूंसह लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ॠषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांची निवड पक्की मानली जात आहे. जर वॉशिंग्टन सुंदरने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली, तर त्याचेही स्थान निश्चित मानले जात आहे.
धवन का पाहिजे?
यूएईमध्ये झालेल्या याआधीच्या आयपीएल सत्रात धवन जबरदस्त यशस्वी ठरला होता. ऑरेंज कॅप विजेत्या राहुलच्या तुलनेत धवनचा स्ट्राइक रेटही जास्त होता. शिवाय, निवडकर्त्यांनी अनुभवास प्राधान्य दिले, तर धवनची निवड निश्चित आहे. त्याचबरोबर, धवनच्या समावेशाने आघाडीच्या फळीत भारताला डावखुरा फलंदाज लाभेल.
हे असतील अष्टपैलू
गोलंदाजी करण्यास तयार असल्यास हार्दिक पांड्याचे अष्टपैलूमध्ये आघाडीवर असेल. रवींद्र जडेजाचे स्थानही निश्चित आहे. वॉशिंग्टन सुंदरची निवड त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. अन्यथा त्याची जागा कृणाल पांड्या घेऊ शकेल.
असा असू शकेल संघ
n भारतीय संघात ५ किंवा ६ फलंदाजांना स्थान मिळू शकते. तसेच, ३ किंवा ४ अष्टपैलू आणि ६ गोलंदाजांची निवड होऊ शकेल. चार अष्टपैलू आणि सहा गोलंदाजांचा पर्याय निवडल्यास शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांची निवड धोक्यात येऊ शकेल.
कोहली सलामीला येणार?
n मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत कर्णधार कोहली रोहित शर्मासह सलामीला खेळला होता. त्यानंतर त्याने भविष्यातही सलामीला खेळायला आवडेल, असे म्हटले होते. त्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेतही कोहलीने सलामीला खेळण्याचे ठरविले, तर धवन आणि पृथ्वी यांचे स्थान धोक्यात येईल. पण, जर अतिरिक्त सलामीवीर निवडण्याचे ठरविले, तर धवन आणि पृथ्वी यांच्यापैकी केवळ एकालाच स्थान मिळेल,
हे नक्की.
Web Title: T20 World Cup: Who will get a chance in the team india? pdc
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.