नवी दिल्ली – मिचेल मार्शच्या जबरदस्त खेळीनं आणि जोश हेजलवुडच्या अचूक गोलंदाजीनं ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप नाव कोरलं आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला ८ विकेटनं हरवत इतिहास रचला. ६ वर्षांनी वर्ल्डकप चॅम्पियन बनल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक खेळाडूचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याचवेळी ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या ड्रेसिंगरुमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
या व्हिडीओत टीमचे खेळाडू बुटात बिअर घालून पितात. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचं स्वप्न धुळीस मिळवणारे धडाकेबाज फलंदाज मैथ्यू वेड आणि ऑलराऊंडर मार्कस स्टोइनिस हे बुटात बिअर टाकून पिताना दिसून आले. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया टीमचं हे सेलिब्रेशन पाहून सगळेच हैराण झाले. परंतु तुम्हाला माहिती आहे का? ऑस्ट्रेलियामध्ये बिअर बुटात टाकून पिणे ही आनंद साजरा करण्याची परंपरा खूपच लोकप्रिय आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू बुटात बिअर टाकून का पित आहेत?
ऑस्ट्रेलियात बुटात बिअर टाकून पिण्याच्या परंपरेला शुई(Shoey) असं म्हणतात. लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट आणि स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये अशाप्रकारे सेलिब्रेशन करणं सर्वसामान्य आहे. या अनोख्या परंपरेचा पाया ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्युला वन स्टार डेनियल रिकियार्डाने २०१६ मध्ये आयोजित जर्मन ग्रैंड प्रिक्समध्ये ठेवला होता. परंतु ऑस्ट्रेलियात ना केवळ खेळाडू तर इतर मोठे कलाकारही आता याचप्रकारे स्टेजवर आनंद साजरा करतात.
त्याचसोबत ऑस्ट्रेलियातील आनंद साजरा करण्याची ही परंपरा इतर देशातही पसरली आहे. अलीकडेच ब्रिटिश रेसिंग ड्रायवर लुइस हेमिल्टनने एमीलिया रोमाग्ना ग्रैंड प्रिक्सच्या पोडियम उद्धाटन सोहळ्यात बुटात बिअर टाकून प्यायली होती. अनेक कलाकारांना ही प्रथा आवडत नाही. सिडनीत २१ वर्षीय एक कॉन्सर्ट फोटोग्राफर जॉर्जिया मौलानी सांगतात की, ते ५ पैकी एका शूटवेळी शुई हा शब्द ऐकतात. अनेकदा हे पाहून अजब वाटतं. विशेष म्हणजे जेव्हा कधी मंचावर कुणी आंतराष्ट्रीय कलाकार हजर असतो. शो वेळी असं करण्यासाठी खूप टाइम लागतो. संपूर्ण जगात एकमेव देश आहे ज्याठिकाणी बुटात बिअर टाकून प्यायली जाते.
बुटात बिअर टाकून प्यायल्याने आजारी?
असंही मानलं जातं की, बुटात बिअर टाकून पिणे हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. मेलबर्नच्या मोनाश यूनिवर्सिटी इंफेक्शियस डिसीज एक्सपर्ट एंटोन पेलेग म्हणतात की, कदाचित कुणी निरोगी आणि स्वच्छ माणसाच्या बुटातून बिअर टाकून पिणे शरीरासाठी कमी धोकादायक ठरू शकतं पण बुटांऐवजी ग्लासमध्ये बिअर टाकून प्यायला हवी असा पर्याय त्यांनी सांगितला आहे.