T20 World Cup, WEST INDIES V BANGLADESH : गतविजेत्या वेस्ट इंडिजचेट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम राखले आहे. बांगलादेशविरुद्ध रोमहर्षक ठरलेल्या लढतीत वेस्ट इंडिजनं ३ धावांनी बाजी मारली. बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह व लिटन दास यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आंद्रे रसेलच्या अखेरच्या षटकानं त्यांना हार मानण्यास भाग पाडले. अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना रसेलनं त्याचा सर्व अनुभव एकवटून सुरेख चेंडू टाकला.
एव्हिन लुईस ( ६) व ख्रिस गेल ( ४) ही जोडी आज सलामीला आली. फॉर्माशी झगडणाऱ्या गेलला सलामीला पाठवूनही काही फरक पडला नाही. शिमरोन हेटमायर ( ९) हाही महेदी हसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मागील दोन सामन्यांत पोलार्डनं एकट्यानं खिंड लढवली होती, पण आजच्या सामन्यात १६ चेंडूंत ८ धावा करून तो रिटायर्ड हर्ट झाला. रोस्टन चेस व निकोलस पूरन यांनी डाव सावरला. निकोलस २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४० धावांवर झेलबाद झाला, तर चेस ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे विंडीजचा संघ पुन्हा बॅकफुटवर फेकला गेला. रिटायर्ड हर्ट झालेला पोलार्ड २०व्या षटकात पुन्हा मैदानावर आला. मुस्ताफिजूरच्या अखेरच्या षटकात तीन खणखणीत षटकार खेचले गेले आणि विंडीजनं ७ बाद १४२ धावा उभ्या केल्या. मुस्ताफिजूर ( २-४३), महेदी हसन ( २-२७) व शोरीफुल इस्लाम ( २-२०) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात आज बांगलादेशचा अनुभवी फलंदाज शाकिब अल हसन सलामीला आला. पण, शाकिब ( ९) व मोहम्मद नईम ( १७) ही जोडी पॉवर प्लेमध्येच माघारी फिरली. सौम्या सरकार ( १७) व मुश्फीकर रहिम ( ८) हेही अपयशी ठरले. वर्ल्ड कप स्पर्धेत रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या जेसन होल्डरनं फलंदाजीपाठोपाठ ( ५ चेंडूंत १५ धावा) गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि ४ षटकांत २२ धावा देत एक विकेट घेतली. पण, लिटन दास व कर्णधार महमुदुल्लाह यांनी विंडीजच्या गोलंदाजांचा सामना केला. अखेरच्या तीन षटकांत ३० धावांची गरज असताना महमुदुल्लाह टोलेजंग फटके मारत होता. ड्वेन ब्राव्होचं त्यानं १९व्या षटकात षटकारानं स्वागत केलं, परंतु अखेरच्या चेंडूवर लिटन दासला ( ४४) बाद करून ब्राव्होनं वचपा काढला. होल्डरनं त्याच्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलताना सीमारेषेवर सुरेख झेल टिपला.
( Andre Russell steps up and defends 13 runs off the last over to get West Indies a win by 3 runs! ) अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी १३ धावा हव्या होत्या. मैदानावर उतरलेल्या आसिफ होसैननं २०व्या षटकात आंद्रे रसेलच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेतल्या. या षटकापूर्वी रसेलनं ३ षटकांत २१ धावा देत १ विकेट घेतली होती. ३ चेंडू ८ धावा हव्या असताना महमुदुल्लानं पुल शॉट मारला, पण आंद्रे फ्लेचरला प्रयत्नकरूनही झेल टिपता आला नाही. पुढच्याच चेंडूवर आणखी एक मिस फिल्ड झाली अन् बांगलादेशला दोन धावा मिळाल्या.