Virat Kohli Rohit Sharma T20 World Cup Trophy: भारतीय संघाने तब्बल १३ वर्षांनी वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी संयमी कामगिरी करत सात धावांनी आफ्रिकेचा पराभव केला आणि १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० विश्वचषकाची ट्रॉफी मायदेशी आणली. भारतीय संघ आज ही ट्रॉफी घेऊन भारतात दाखल झाला. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केल्यानंतर टीम इंडिया मुंबईला रवाना झाली. मुंबईत झालेल्या विजयी मिरवणुकीत ओपन डेक बसमध्ये टीम इंडियाने चाहत्यांसोबत यश साजरे केले. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी उपस्थित जनसमुदायासमोर एकत्रित वर्ल्डकप उंचावला.
भारतीय संघ मुंबईत संध्याकाळी दाखल झाला. ठरल्याप्रमाणे मुंबई विमानतळावरून संघातील सर्व खेळाडूंना नरिमन पॉईंटला आणण्यात आले. तेथून मुंबईच्या मरिन ड्राईव्हवरून विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली. काल रोहित शर्माने ट्विट करून सर्व क्रिकेटप्रेमींना वानखेडेवर आणि मरिन ड्राईव्ह येण्याचे आवाहन केले होते. त्याला ट्विटला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि टीम इंडियाच्या चाहत्यांनी दुपारपासूनच तोबा गर्दी केली. संध्याकाळपर्यंत संपूर्ण मरिन ड्राईव्ह आणि वानखेडे मैदानात खचाखच भरले. त्यानंतर विजयी मिरवणूक सुरु असताना टीम इंडिया कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली या दोघांनी एकत्रितपणे जल्लोष केला. उपस्थित फॅन्सच्या साठी विराट-रोहितने एकत्र हात लावून वर्ल्डकपची ती ट्रॉफी उंचावत प्रचंड जल्लोष केला. त्यांच्या या कृतीमुळे लाखोंच्या जनसमुदायामध्ये एक वेगळीच ऊर्जा भरल्याचे दिसून आले. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, भारताचा संघ विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाला. या ठिकाणी BCCIने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी साऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी स्टार खेळाडूंनी चाहत्यांशी संवाद साधत मुलाखती दिल्या. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वर्ल्डकपची ट्रॉफी बीसीसीआयला सुपूर्द केली.